कळंब - कळंब शहरातील शिवसेनेत पुन्हा एकदा बंडखोरीचे वारे वाहू लागले आहेत. शहरप्रमुख गजानन चोदें यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण सोडून उबाठा गटाची मशाल हाती घेतली आहे. या घडामोडीमुळे कळंब नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे.गजानन चोंदे यांनी पूर्वी तालुकाप्रमुख लक्ष्मीकांत हुलजुते यांच्या नेतृत्वाखाली अनंतराव वाघमारे यांच्या सोबत राहुन शिवसेनेचा पाया भक्कम केला, त्यावेळेस शिवसेनेचा जनाधार कमी असला तरी पक्षाला उभारी देण्याचं काम केलं होतं नंतर अजित पिंगळे यांना उमेदवारी मिळाली आणि बाजार समितीचे सभापती शिवाजी आप्पा कापसे यांनी धनुष्यबाण हाती घेतल्याने शिवसेनेची ताकत वाढली होती मात्र सध्या पक्षांतर्गत बंडखोरीमुळे असंतोष पुन्हा उफाळला असे सध्या चित्र आहे शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन चोदें यांनी प्रभाग क्रमांक ९ मधून उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने ते नाराज झाले आणि अखेर शिवसेनेला रामराम ठोकत उबाठा गटात प्रवेश केला. या वेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या उपस्थितीत चोदें यांचा औपचारिक प्रवेश झाला.या प्रसंगी महेश कोळपे, मुकेश चोदें, दीपक हारकर, आकाश चव्हाण, प्रसन्न हुलसुलकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उबाठा गटात प्रवेश घेतला.काँग्रेसच्या गळाला माजी नगरसेवक प्रताप मोरे – शिवाजी कापसे यांना धक्का कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे यांचे निकटवर्तीय व माजी नगरसेवक प्रताप मोरे यांनी काँग्रेसकडे झुकते माप दिले आहे. त्यांच्या पत्नी अर्चना मोरे यांना प्रभाग क्रमांक ६ मधील सर्वसाधारण महिलांच्या जागेवरून उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर, मोरे दांपत्याने काँग्रेसचे सचिव पांडुरंग कुंभार यांच्या सोबत काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.या हालचालीमुळे शिवाजी कापसे यांना मोठा राजकीय धक्का बसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची ताकद वाढल्याचे स्पष्टपणे दिसत आहे, आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.राजकीय समीकरणे बदलाच्या उंबरठ्यावर-कळंब नगरपरिषदेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे सर्व पक्षांत बंडखोरीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेना, काँग्रेस आणि इतर पक्षांतील नेते मंडळी नवे समीकरण तयार करताना दिसत आहेत. पुढील काळात कोण उमेदवार सरस राहील हे वेळच ठरवेल, मात्र सध्या कळंब शहरात राजकारणात मोठी चुरस निर्माण झाल्याचे दिसत आहे
Tags
कळंब
