धाराशिव - :- (प्रतिनीधी):-
धाराशिव जिल्ह्यातील साखर व गुळ उत्पादक कारखानदारांनी चालू वर्षातील एफआरपी जाहीर करून ऊस उत्पादक शेतकर्यांना रक्कम द्यावी तसेच खरीप हंगामातील पीकविमा तत्काळ जमा करावा यासह शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले आहे. मागण्याची दखल न घेतल्यास प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी सर्व नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीर गाळप सुरू करून ऊस उत्पादक शेतकर्यांची चेष्टा केली आहे. ऊसदर न ठरवता गाळप चालू करून शेतकर्यांच्या ताटात माती कालवली आहे. आम्ही किती वफादार आहोत हे दाखवण्यासाठी साखर सम्राटांचे बगलबच्चे कारखानदारांच्या दारात शेपूट हलवत आहेत. त्यास प्रशासनही जबाबदार असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. त्यामुळे 15 नोव्हेंबरपर्यंत प्रतिटन 3500 रूपये विना कपात ऊसदर जाहीर करावा अन्यथा 17 नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील सर्व ऊसतोड बंद केली जाईल. ऊस दराबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही. त्याचबरोबर साखर कारखान्यातील वजनकाटे ऑनलाईन करण्यात यावे, त्यावर शेतकरी प्रतिनिधीची स्वाक्षरी घ्यावी असेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी राजाभाऊ हाके, सचिन टाले, शहाजी सोमवंशी, धनाजी पेंदे, दुर्वास भोजने, तानाजी पाटील, विष्णू काळे, कमलाकर पवार, अभय साळुंके, चंद्रकांत समुद्रे आदी उपस्थित होते.
Tags
धाराशिव