रब्बी हंगामासाठी पिक विमा भरण्याची अंतिम मुदत जाहीर*

रब्बी ज्वारीसाठी ३० नोव्हेंबर,गहू, हरभरा व रब्बी कांद्यासाठी १५ डिसेंबर अंतिम तारीख

धाराशिव,दि.१३ नोव्हेंबर (प्रतिनिधी) रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्ती,किड व रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकरी नोंदणीसाठी राष्ट्रीय विमा संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे.

चालू रब्बी हंगामात कर्जदार व बिगरकर्जदार शेतकऱ्यांना पिक विम्याचा हप्ता भरण्याची अंतिम मुदत पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे — रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत) : ३० नोव्हेंबर २०२५,गहू (बागायत), हरभरा व रब्बी कांदा : १५ डिसेंबर २०२५,उन्हाळी भुईमूग : ३१ मार्च २०२६ आहे.

ही योजना कर्जदार तसेच बिगरकर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून,कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास त्यांनी अधिसूचित पिकांसाठी नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधीपर्यंत संबंधित बँकेस विमा हप्ता कपात न करण्याबाबत घोषणापत्र देणे आवश्यक आहे.जे शेतकरी असे घोषणापत्र सादर करणार नाहीत, त्यांचा योजनेत सहभाग बंधनकारक मानला जाईल.

प्रती हेक्टर विमा हप्ता दर पुढीलप्रमाणे : रब्बी ज्वारी (बागायत) - विमा संरक्षण 36 हजार रुपये प्रति हेक्टर,450 रुपये शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर,रब्बी ज्वारी (जिरायत)36 हजार रुपये,450 रुपये शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर, गहू (बागायत) - 45 हजार रुपये,562 रुपये 50 पैसे, हरभरा -36 हजार रुपये ,450 रुपये शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर,रब्बी कांदा - 90 हजार रुपये,1,125 रुपये शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर,उन्हाळी भुईमूग - 40 हजार 600 रुपये,507 रुपये 50 पैसे शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर असा आहे.

शेतकऱ्यांनी ज्या पिकाची पेरणी केलेली आहे,त्या पिकाबाबतचे स्वयंघोषणापत्र, सातबारा उतारा,आधारकार्ड व बँक पासबुकची प्रत यांसह जवळच्या बँकेत अथवा ‘आपले सरकार सेवा केंद्रा’वर जाऊन विमा हप्ता भरून आपले पीक संरक्षित करावे.

शेतकऱ्यांनी या योजनेत जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा,असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,धाराशिव यांनी आवाहन केले आहे.तसेच अधिक माहितीसाठी www.pmfby.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा किंवा नजिकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा,असेही त्यांनी सांगितले आहे.
                ----------------------

Post a Comment

Previous Post Next Post