जिल्हा क्रीडा सप्ताहाला सुरुवात*

पालघर  जिल्हा (प्रतिनिधी) :– अमीन मेमन :– दि. १२ डिसेंबर : जिल्ह्यात क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि युवक-विद्यार्थ्यांमध्ये खेळांविषयी रुची निर्माण करण्याच्या उद्देशाने “जिल्हा क्रीडा सप्ताह २०२५” आजपासून १८ डिसेंबरपर्यंत उत्साहात साजरा होणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार, शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांबरोबरच अनुदानित, विनाअनुदानित शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, विद्यापीठे, क्रीडा असोसिएशन्स, क्रीडा मंडळे आणि अकादमींना आपल्या स्तरावर विविध उपक्रम राबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

क्रीडा संस्कृतीसाठी विविध उपक्रमांची मालिका
जिल्हा क्रीडा आठवड्यात विद्यार्थ्यांपासून नागरिकांपर्यंत सर्वांना सहभागी करणारे बहुविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
मुख्य उपक्रमांमध्ये—
• ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांच्या प्रेरणादायी जीवनगाथेवर व्याख्यान
• क्रीडा संस्कृती जपण्यासाठी रॅली व मॅरेथॉन स्पर्धा
• शालेय विद्यार्थ्यांसाठी नियमावली, ऑलिंपिक स्पर्धा व नामवंत खेळाडूंची माहिती देणारे मार्गदर्शन शिबिर
• ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांचा प्रसिद्ध खेळाडूंशी थेट संवाद
• विविध खेळांचे प्रदर्शनीय सामने व विजेत्यांचा गौरव
• आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार
• जिल्हा क्रीडा पुरस्कार वितरण समारंभ
• अनुभवी खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक यांच्या उपस्थितीत करिअरविषयक परिसंवाद
• उत्कृष्ट क्रीडा सुविधा असलेल्या संकुलांना भेटी

क्रीडा विकासाचा पाया अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न
जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन, प्रेरणा आणि संधी मिळावी यासाठी या उपक्रमांची अंमलबजावणी महत्त्वाची ठरेल, असा विश्वास जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post