बोईसर (प्रतिनिधी) :–विकास सिंह :– बोईसर जवळील परनाळी परिसरात साने गुरुजी को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या निवडणुकीद रम्यान उसळलेल्या वादातून रविवारी दुपारी दोन गट आमनेसामने येत तुंबळ हाणामारी झाली. पोलिसांसमोरच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले.
जय वाघोबा देव सहकार पॅनलचे उमेदवार दिनेश विष्णू मातेरा यांच्यावर समोरच्या पॅनेलचा पराभव झाल्यानंतर आदिवासी समाजाच्या उमेदवाराला आदिवासी-वाचक शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी म्हणून संजय पिंपळे, कुंदन संखे, दिपेश पिंपळे, मोहित दत्तात्रय संखे, अरविंद संखे, प्रमोद पिंपळे, दत्तात्रेय संखे आणि विपुल पिंपळे यांची नावे समोर आली आहेत.
या हाणामारीत दोन्ही गटांतील तीन ते चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. घटना पालघर जिल्ह्यातील तारापूर पोलीस ठाणे हद्दीत घडली.
घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही गटांना शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम १८९(१), १८९(२), १८९(३), १९१(२), १९०, ११५, ३५२, ३५१(२) तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ मधील कलम ३(१)(r) आणि ३(१)(s) नुसार गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून आरोपींवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेमुळे परनाळी परिसरात नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Tags
जिल्हा पालघर