पालघर जिल्हा (प्रतिनिधी) :–अमीन मेमन :– पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या घटनेने परिसर हादरला आहे. उटावली आदर्श विद्यालयात शिकणाऱ्या मयंक विष्णु कुवरा (वय 11, इयत्ता 5वी) या विद्यार्थ्यावर जंगलातून घरी जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली. मयंकसोबत असलेल्या मित्राच्या तत्परतेने आणि मयंकच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला.
घटना कशी घडली?
शाळा सुटल्यानंतर मयंक नेहमीप्रमाणे माळा पाडवीपाडा येथे जाण्यासाठी जंगल रस्त्याने चालत होता. चार किलोमीटरचे अंतर पार करत असताना अचानक बिबट्याने मागून हल्ला चढवला. बिबट्याचे वार थेट मयंकच्या दप्तरावर बसल्यामुळे त्याचा जीव थोडक्यात वाचला. नखांच्या प्रहारामुळे त्याच्या हाताला खोल जखमा झाल्या.
विद्यार्थ्यांचे धाडस; बिबट्या पसार
हल्ल्याच्या वेळी मयंकने आरडाओरड करत प्रतिकार केला, तर सोबत असलेल्या विद्यार्थ्याने तत्काळ दगडफेक केली. गावकऱ्यांना आवाज ऐकताच ते घटनास्थळी धावत आले, त्यामुळे बिबट्या जंगलात पसार झाला. मुलांच्या उपस्थितीवृत्तीचे आणि धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
परिसरात भीतीचे वातावरण
मागील काही दिवसांपासून या परिसरात बिबट्या फिरत असल्याची चर्चा होती. काही गावकऱ्यांनी याबाबतचे व्हिडिओ सोशल मीडियावरही शेअर केले होते. तरीही विद्यार्थी रोज जंगलमार्गेच प्रवास करत असल्याने पालक आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मयंकवर उपचार सुरू
जखमी मयंकवर विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून खोल जखमांवर टाके घालण्यात आले आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
ग्रामस्थांची मागणी — वन विभागाने तातडीने पावले उचलावीत
घटनेनंतर नागरिकांनी शाळा परिसर आणि जंगल पट्ट्यात गस्त वाढवावी, विद्यार्थ्यांच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करावी, अशी मागणी वन विभागाकडे केली आहे.
---
दरम्यान, नाशिकमध्ये बिबट्या पिंजऱ्यात अडकला
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सोनेवाडी शिवारात गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला. चार दिवसांपूर्वी तक्रारीनंतर वन विभागाने येथे पिंजरा लावला होता. अंदाजे सहा वर्षांचा नर बिबट्या जेरबंद झाला असून त्याची रवानगी मोहदरी वनोद्यानात करण्यात आली आहे.
Tags
जिल्हा पालघर