सिंचन विहिर दुरुस्तीकरिता ३० हजार रुपयांपर्यंत मदत ;शेतकऱ्यांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
धाराशिव,दि.१३ नोव्हेंबर (जिमाका) सन २०२५-२६ या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर शासन व मनरेगा विभागाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विशेष पुनर्वसन उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) पुढीलप्रमाणे आर्थिक मदत देण्यात येणार आहे.खरडून गेलेल्या शेतीजमिनींच्या पुनर्वसनासाठी प्रति हेक्टर ३ लाख रुपये,तसेच जास्तीत जास्त २ हेक्टरपर्यंत ५ लाख रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे. खचलेल्या किंवा बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीकरिता प्रति विहीर ३० हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीजमिनी व सिंचन साधनांची पूर्वस्थिती पुनर्संचयित करण्यास मदत होईल.परिणामी, आगामी हंगामात शेती पुन्हा सक्षम व उत्पादनक्षम होईल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की,त्यांनी आपले प्रस्ताव संबंधित गटविकास अधिकारी (पंचायत समिती) यांचेकडे सादर करावेत.तपासणी व मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल.
-------------------------
Tags
धाराशिव जिल्हा