धाराशिव,दि.13 नोव्हेंबर (प्रतिनिधी) केंद्र शासनाने सन 2027 पर्यंत देशभरातील कुष्ठरोगाचा प्रसार शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.या पार्श्वभूमीवर शासनाने कुष्ठरोगाचा प्रसार रोखण्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेतल्या असून,सर्व नवीन कुष्ठरुग्णांची नोंदणी करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.
कुष्ठरोगाचा प्रसार थांबविण्यासाठी समाजात लपून राहिलेले नवीन रुग्ण शोधून त्यांना एम.डी.टी.(Multi Drug Therapy) उपचार देणे आणि रोगप्रसाराची साखळी खंडित करणे अत्यावश्यक आहे.यासोबतच नव्याने सापडलेल्या रुग्णांच्या निकट सहवासीतांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रिफाम्पीसीन या औषधाची एक मात्रा दिली जाते.ही एकदिवसीय मात्रा रोगप्रसाराची साखळी खंडित करण्यास अत्यंत प्रभावी ठरत आहे.
मात्र,अद्याप अनेक रुग्ण सामाजिक भीतीमुळे शासकीय दवाखान्यात न जाता खाजगी दवाखान्यांत उपचार घेत आहेत. अशा रुग्णांची आरोग्य विभागाकडे नोंद नसल्याने त्यांच्या सहवासीतांना प्रतिबंधात्मक औषधोपचार देणे शक्य होत नाही.जिल्ह्यात सन 2024-25 दरम्यान 599 नवीन कुष्ठरुग्णांची नोंद करण्यात आली असून,सर्व रुग्णांना आवश्यक उपचार देण्यात आले आहेत.
राज्यातील वाढत्या कुष्ठरुग्णांची दखल घेत शासनाचे राजपत्र दिनांक 30 ऑक्टोबर 2025 नुसार कुष्ठरोगाला “Notifiable Disease” म्हणून घोषित केले आहे. म्हणजेच, प्रत्येक नवीन रुग्णाची माहिती शासनाच्या आरोग्य यंत्रणेला देणे आता अनिवार्य झाले आहे.
जिल्ह्यातील किंवा इतर जिल्ह्यातील खाजगी दवाखान्यांत नोंदणी झालेल्या नवीन कुष्ठरुग्णांची माहिती संबंधित वैद्यकीय अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी,वैद्यकीय अधीक्षक (उपजिल्हा/ग्रामीण रुग्णालय),जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता,जिल्हा आरोग्य अधिकारी आणि सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) यांना कळविणे बंधनकारक आहे.दोन आठवड्यांच्या आत स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांकडे ही माहिती सादर करावी लागेल.
कुष्ठरोग हा मायक्रोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार असून तो त्वचा,मज्जातंतू, डोळे आणि इतर अवयवांवर परिणाम करतो.समाजात अजूनही या आजाराबाबत गैरसमज,भीती आणि भेदभावाची भावना आहे.लवकर निदान न झाल्यास आणि उपचारास विलंब झाल्यास रुग्णांमध्ये विकृती (दर्जा-2) निर्माण होण्याची शक्यता असते.त्यामुळे लवकर निदान आणि संपूर्ण औषधोपचार हे कुष्ठरोग निर्मूलनाचे मुख्य घटक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
यापूर्वी रुग्णांची स्वतंत्र नोंद ठेवणे बंधनकारक नसल्याने अनेक डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार होत होते,परंतु रुग्णांची माहिती शासनाकडे पोहोचत नसल्याने रोगाचे अचूक प्रमाण समजणे अवघड होत होते.
माहे नोव्हेंबर 2025 पासून सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्या दवाखान्यात आलेल्या कुष्ठरुग्णांची माहिती आरोग्य विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना सादर करावी,असे आवाहन डॉ.धनंजय चाकुरकर (जिल्हा शल्यचिकित्सक), डॉ.सतीश हरिदास (जिल्हा आरोग्य अधिकारी) व डॉ.मारुती कोरे (सहाय्यक संचालक,कुष्ठरोग) यांनी केले आहे.
Tags
जिल्हा धाराशिव