पालघर जिल्हा (प्रतिनिधी) :– अमीन मेमन :– तालुक्यातील वाडा कोलम व बहुउद्देशीय शेती उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, वावेघर या संस्थेच्या आर्थिक कारभारात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग–१, सहकारी संस्था, पालघर यांनी केलेल्या तपासणी अहवालात संस्थेच्या व्यवहारांमध्ये अपहार, नियमांचे उल्लंघन, प्रशासकीय हलगर्जीपणा तसेच संस्थेच्या उद्दिष्टांपासून दूर गेलेला कारभार स्पष्टपणे निदर्शनास आला आहे.
सदर तपासणी अहवाल तात्काळ लेखापरीक्षक श्रेणी–१, सहकारी संस्था, वाडा यांच्या पत्रानुसार करण्यात आला असून, त्याचा सविस्तर अहवाल सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, वाडा यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. तपासणीत २०१९ ते २०२५ या कालावधीत संस्थेच्या आर्थिक व्यवहारात मोठ्या प्रमाणावर अनियमितता, नियमबाह्य व्यवहार तसेच निधीचा गैरवापर झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत संस्थेचे अध्यक्ष बी. बी. ठाकरे (वावेघर), सचिव वैभव नामदेव पाटील (देवळी) तसेच संस्थेचे इतर सर्व संचालक यांच्याविरोधात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा (एफआयआर) दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत पालघर जिल्हा पोलीस अधीक्षकांना तातडीने गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
या घटनेमुळे वाडा तालुक्यातील शेतकरी सभासदांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, सहकारी संस्थांच्या पारदर्शक आणि जबाबदार कारभाराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दोषींवर कठोर कारवाई होऊन शेतकरी सभासदांच्या हिताचे संरक्षण करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.
Tags
पालघर जिल्हा