पालघर तलासरी (प्रतिनिधी) :– अशरफ खान :– दि.12/12/2025
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातील जिल्हास्तरीय प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतींची कोकण विभाग स्तरावर तपासणी करण्यात आली. ही तपासणी कोकण विभागाचे सहायक आयुक्त घोरपडे साहेब तसेच समिती सदस्य मा. गणेश गांधले यांच्या उपस्थितीत 11 व 12 डिसेंबर 2025 रोजी पार पडली.
सन 2023-24 मध्ये पालघर तालुक्यातील कुरगाव ग्रामपंचायत तसेच सन 2024-25 मध्ये डहाणू तालुक्यातील घोलवड ग्रामपंचायत यांनी जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर वाडा तालुक्यातील खानिवली ग्रामपंचायतीने सलग दोन वर्षे (2023-24 व 2024-25) द्वितीय क्रमांक मिळवला असून या तिन्ही ग्रामपंचायतींची विभागीय समितीद्वारे सविस्तर तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान परिशिष्ट-2 नुसार ग्रामपंचायतींच्या दप्तरी नोंदींची पडताळणी करून गावात प्रत्यक्ष भेटी घेण्यात आल्या. यात घरगुती शौचालयांची उपलब्धता व नियमित वापर, पाणीपुरवठा व्यवस्था, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट, तसेच शाळा, अंगणवाडी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील स्वच्छता व शौचालय व्यवस्थापन या घटकांची समितीने पाहणी केली.
या वेळी जिल्हा पाणी-स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक अतुल पारसकर, गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते, वाडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वैभव शिंदे, सहायक गटविकास अधिकारी रेखा बनसोडे, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी तसेच खानिवली, घोलवड आणि कुरगाव ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags
जिल्हा पालघर