"100 रुपयांच्या नोटरी बॉण्डवर उमेदवाराचे जुगार व ड्रग्जविरोधी अभिवचन, तुळजापूरमध्ये चर्चेचा विषय"


तुळजापूर :-  आम संघर्ष टाईम्स online : तुळजापूर नगर परिषद निवडणुकीत एका उमेदवाराने १०० रुपयांच्या नोटरीकृत बॉण्डवर केलेले अनोखे शपथपत्र सध्या व्हायरल झाले आहे. पत्रकार शुभम कमल कदम या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या तर्फे प्रभाग क्रमांक २ (अ) अनुसूचित जाती पुरुष या प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांनी सार्वजनिकरीत्या एक वेगळे अभिवचन दिले आहे.

आपल्या शपथपत्रात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की—
“मी मटका व्यवसाय करणार नाही, जुगार खेळाचा अड्डा चालवून पैसे कमवणार नाही, मी गांजा किंवा ड्रग्ज विकणार नाही आणि माझ्या सोबतच्या कोणालाही अशा बेकायदेशीर गोष्टींसाठी प्रोत्साहन देणार नाही.”

हे शपथपत्र व्हायरल झाल्याने तुळजापूरमध्ये विविध चर्चांना उधाण आले असून, अशा प्रकारचे निवडणूक-अभिवचन देण्यामागे स्पष्टपणे परिसरातील काही हालचालींचा संदर्भ असल्याची चर्चा आहे.

शुभम कदम यांनी आपल्या संदेशात मतदारांना उद्देशून म्हटले आहे की, लोकशाही सक्षम करण्यासाठी त्यांनी मतदान करून दिलेला विश्वास अखंड राखला जाईल. नगर परिषदेच्या माध्यमातून जनतेसाठी उपलब्ध सेवा-सुविधा अधिक परिणामकारकरीत्या पोहोचवण्यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहेत.

प्रभागातील स्वच्छता, लाईट, तसेच लहान मुलांचे क्रीडांगण अबाधित राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचेही त्यांनी आश्वासन दिले आहे. याशिवाय तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून पार्किंगच्या नावाखाली होणाऱ्या कथित लुटीवर अंकुश ठेवण्यासाठी ते पुढाकार घेणार असल्याचे त्यांच्या अभिवचनात नमूद आहे. पोलिसांकडून भाविकांकडून आकारला जात असल्याचा आरोप असलेल्या ‘जजिया कर’ प्रकाराविरुद्ध ते ठाम आवाज उठवतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

कदम यांनी पुढे स्पष्ट केले की—
“मी कोणत्याही सत्ताधाऱ्यांशी वैयक्तिक स्वार्थासाठी हातमिळवणी करणार नाही. विकासकामांच्या दर्जाबाबत हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. मी मत विकत घेणारा व्यापारी नाही; पत्रकार म्हणून समाजाचे वास्तव दाखवणारा कार्यकर्ता आहे.”

तुळजापूरमध्ये उमेदवारीसोबत असे स्पष्ट, थेट आणि वादग्रस्त मुद्दे मांडणारे शपथपत्र समोर येणे ही दुर्मिळ बाब असून, या प्रकरणाने स्थानिक राजकारणाला नवा रंग दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post