तलासरी (प्रतिनिधी) :– अशरफ खान :– मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विक्रमगड पंचायत समिती येथे 18 नोव्हेंबर रोजी महत्त्वपूर्ण तालुकास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका डॉ. रूपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अशोक पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मनरेगा) अतुल पारस्कर, गटविकास अधिकारी महेश पांढरे तसेच विक्रमगड तालुक्यातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी ग्रामविकासाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी समृद्ध पंचायत राज अभियान हे अत्यंत महत्त्वाचे माध्यम असल्याचे सांगितले. “ग्रामपंचायतींनी या अभियानात सक्रियतेने सहभागी होत आपल्या विकासाचा स्पष्ट आराखडा तयार करावा. प्रत्येक गावाने सामूहिक प्रयत्नांद्वारे प्रगतीची नवी परंपरा निर्माण केली, तर जिल्ह्याची ओळख अधिक सक्षमपणे राज्यात निर्माण होईल,” असे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, प्रलंबित कामांना वेग देण्यासाठी प्रशासनाने सुसूत्रता वाढवावी आणि आचारसंहितेपूर्वी आवश्यक मान्यतांची पूर्तता करावी. विकासकामांची अंमलबजावणी करताना गुणवत्ता आणि वेळेचे भान राखणे ही प्रत्येक अधिकाऱ्याची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सर्व ग्रामपंचायतींनी उल्लेखनीय कार्य करून पुरस्कार प्राप्त करावेत असे आवाहन देखील त्यांनी केले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी देखील विभागांमधील समन्वय वाढवून तालुक्यातील अधिकाधिक ग्रामपंचायतींना या अभियानात सहभागी करून घेण्याचे आवाहन केले. ग्रामपंचायतींच्या सक्रिय सहभागामुळे तालुका आणि जिल्हास्तरावरील उद्दिष्टांची पूर्तता अधिक प्रभावीपणे साध्य होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.
बैठकीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी वाकी म्हसेपाडा येथे भेट देऊन मोडकळीस आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याची पाहणी केली. त्यांनी आपत्ती व्यवस्थापन बोटीतून जाऊन बंधाऱ्याच्या नवीन जागेचीही पाहणी केली. यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांना भेट देऊन पाहणी केली.तसेच जिल्हा परिषद शाळेस भेट देऊन विद्यार्थ्यांशी व शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
Tags
जिल्हा पालघर