तुळजापूर :-(प्रतिनीधी):- तुळजापूर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ३ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार डॉ. अनुजा अजित कदम यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने त्या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. या विजयानंतर भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
डॉ. अनुजा कदम या तुळजाभवानी देवीच्या भोपे पुजारी परंपरेतील आहेत. त्या उच्चशिक्षित डॉक्टर असून प्रथमच नगरसेवक बनल्या आहेत. त्यांचा राजकीय वारसा भक्कम असून त्यांचे वडील अजित कदम हे नगरसेवक व नगराध्यक्ष राहिले आहेत. तसेच आजोबा किसनराव कदम यांनी पंधरा वर्षे नगरपरिषदेचे सदस्य म्हणून काम पाहिले होते, तर आजी लतिकाबाई कदम याही नगरसेवक झाल्या होत्या.
विजयानंतर प्रतिक्रिया देताना डॉ. अनुजा कदम म्हणाल्या,
“तुळजापूर शहराच्या विकासासाठी, विशेषतः भाविकांच्या सुविधांसाठी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या विकास आराखड्याला आम्ही पाठबळ देऊ. नागरिकांच्या चांगल्या सूचना प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध राहू.”
दरम्यान, या प्रभागात मधुकर शेळके यांना पक्षाचा एबी फॉर्म न मिळाल्यामुळे त्यांनी माघार घेतली, त्यामुळे बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.
विजयानंतर भाजप नेते विनोद गंगणे, तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, पुजारी सचिन कदम, लखन पेंदे तसेच कदम परिवार आणि भाजप कार्यकर्त्यांनी डॉ. अनुजा कदम यांचे अभिनंदन करून आनंद व्यक्त केला.
Tags
धाराशिव जिल्हा