तलासरी (प्रतिनिधी) :– अशरफ खान :– मोखाडा तालुक्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अंतर्गत विविध विकासकामांची प्रगती तपासणी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी आज केली. बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका डॉ. रूपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत अशोक पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पारस्कर प्रभारी गटविकास अधिकारी डॉ.भाऊसाहेब चतर तसेच तालुक्यातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान प्रकल्प संचालिका डॉ. रूपाली सातपुते यांनी डिसेंबरअखेर सर्व अपूर्ण घरकुल पूर्ण करण्याबाबत मार्गदर्शन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी देखील प्रलंबित कामांना गती देऊन तालुक्यातील विकास उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना केल्या.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी योजनांच्या शिस्तबद्ध अंमलबजावणीवर भर देत अधिकारी-कर्मचाऱ्यांना नियोजित वेळेत काम पूर्ण करण्याचे आवाहन केले. प्रधानमंत्री जनमन योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना यांसह विविध गृहयोजनांचा प्रगती आढावा या बैठकीत घेण्यात आला.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा – उमेद अंतर्गत सर्व महिलांचा स्वयं-साहाय्य गटांमध्ये समावेश व्हावा, कोणतीही महिला गटाबाहेर राहू नये यासाठी आवश्यक नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. सार्वजनिक शौचालय प्रकल्पांची पूर्तता आणि मनरेगा अंतर्गत चालू असलेल्या कामांचा आढावा उपमुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पारस्कर यांनी घेतला.
मोखाडा तालुक्यातील पाणीटंचाईच्या समस्येवर विशेष भर देत, शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी वेळेत आणि परिणामकारकरीत्या होण्याचे महत्त्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अधोरेखित केले. तसेच ‘समृद्ध पंचायत राज अभियानात तालुक्याने उल्लेखनीय स्थान मिळवावे’ यासाठी अधिकाऱ्यांना प्रेरणा दिली.
बैठकीच्या आधी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी ग्रामपंचायत विभागाचा सविस्तर आढावा घेतला.
बैठकीनंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन घरकुलांची पाहणी केली व लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच मनरेगा अंतर्गत तुळ्याचा पाडा येथे गायगोठ्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी स्थानिक सरपंच ग्रामपंचायत अधिकारी तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
Tags
जिल्हा पालघर