खावडा ट्रान्समिशन प्रकल्पाच्या भरपाईला वेग;--लाभार्थ्यांमध्ये समाधानाची लाट...

पालघर (प्रतिनिधी) :– अमीन मेमन :– पालघर व ठाणे जिल्ह्यात खावडा पॉवर ट्रान्समिशन लिमिटेडतर्फे टॉवर उभारणीसाठी वापरलेल्या जमिनीच्या भरपाई प्रक्रियेला मोठा वेग आला असून लाभार्थ्यांमध्ये समाधानाची लाट पसरली आहे. उच्च भरपाईच्या दरांसह दस्तऐवज तपासणी आणि डिमांड ड्राफ्ट वितरणाची मोहिम वेगाने पुढे सरकत असल्याने शेतकरी व भूधारक आनंद व्यक्त करत आहेत.

कंपनीने भरपाई वितरणाच्या पहिल्या टप्प्यात २० लाभार्थ्यांची नावे जाहीर केली असून, त्यांना तातडीने डिमांड ड्राफ्ट प्रदान करण्यास सुरुवात झाली आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता-जसे की क्षेत्रमोजणी प्रमाणपत्र, संबंधित राजस्व अधिकाऱ्यांची मंजुरी आणि एसडीएम कार्यालयाचे आदेश,यासाठी लाभार्थी उत्साहाने पुढे येत असल्याने भरपाईची गती आणखी वाढली आहे.

चार प्रमुख तालुक्यांमधील जमीनभरपाईचे अधिकृत दर संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले असून, भिवंडी तालुक्यासाठी प्रति चौ.मी. रु.३,३००, वाड्यासाठी रु.१,२५३, विक्रमगडसाठी रु.६२७ आणि जव्हार तालुक्यासाठी रु.२४४ असा भरपाईचा दर निश्चित करण्यात आला आहे. या उच्च दरांमुळे लाभार्थ्यांचा प्रतिसाद अधिक उत्साहपूर्ण आहे.

वाडा तालुक्यातील बंडू जानू माथे यांना रु.६,०१,८७९ किमतीचा पहिला डिमांड ड्राफ्ट देण्यात आला असून, टॉवर उभारणी पूर्ण झाल्यावर त्यांना याच प्रमाणात आणखी एक हप्ता मिळणार आहे. त्यामुळे त्यांची एकूण भरपाई १२ लाख रुपयांपेक्षा जास्त होणार आहे. याशिवाय, पिकभरपाईच्या रूपात खावडा कंपनीने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला असून आतापर्यंत रु. १,०४,१९,८६४ इतकी रक्कम विविध लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली आहे.

टॉवर बांधकामादरम्यान जेथे झाडांची तोड आवश्यक ठरली, त्यासाठी महसूल, उद्यान व वन विभागांनी संयुक्त मूल्यांकन करून त्यानुसार भरपाईही मंजूर केली आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जमीनभरपाईची रक्कम मोठी असल्याने दस्तऐवज तपासणी अधिक काटेकोरपणे केली जात आहे. मात्र, प्रक्रियेत सुरळीतता राखत प्रत्येक लाभार्थ्याला न्याय्य आणि तत्पर भरपाई देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. खावडा ट्रान्समिशन प्रकल्पाची भरपाई प्रक्रिया आता निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, पुढील काही दिवसांत आणखी मोठ्या संख्येने लाभार्थ्यांना डिमांड ड्राफ्ट वाटप होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post