सरावलीतील ‘गो ग्रीन इको टेक’ उद्योगावर पर्यावरणीय नियमभंगाचा ठपका; कोलवडेत स्थलांतरास स्थानिकांचा तीव्र विरोध.

 
बोईसर (प्रतिनिधी) :– विकास सिंह :– सरावली येथील गो ग्रीन इको टेक सोल्यूशन प्रा. लि. या उद्योगाकडून केंद्रीय पर्यावरण विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अटींचे पालन न झाल्याचे उघड झाल्यानंतर प्रादेशिक अधिकारी किरण हसबनिस यांनी १७ ऑक्टोबर २०२५ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सात दिवसांत लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश देऊनही उद्योगाकडून उत्तरे समाधानकारक नसल्याचे समजते.

संमती अटींचे उल्लंघन स्पष्ट

मौजे सरावली येथील स. नं. ५५ मधील प्लॉट क्रमांक ८, ९, १३, १४, १९ व २० येथे हा उद्योग सुरू असून ३१ सप्टेंबर २०२३ रोजी मिळालेल्या संमतीतील अनेक अटींचे पालन होत नसल्याचे संयुक्त तपासणीत आढळले.
केंद्रीय पर्यावरण विभागाने निर्देशित केलेल्या ‘सामान्य धोकादायक कचरा साठवणूक व विल्हेवाट’ संदर्भातील प्रक्रिया त्रुटी,
● धोकादायक घनकचऱ्याच्या प्रक्रियेत अनियमितता,
● आवश्यक अग्निविरोधक यंत्रणेचा अभाव,
● वायु प्रदूषण नियंत्रण प्रणालीचे अपुरे मूल्यांकन,
● तसेच पुनर्प्रक्रियेसाठी घेतलेल्या श्रेणीतील आवश्यक सुधारणांचा अभाव

या कारणांमुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने गंभीर आक्षेप घेत उद्योगाला नोटीस बजावली आहे.

उद्योगाचे कोलवडे येथे स्थलांतर—उद्भवले नवीन आंदोलनाचे वातावरण

सरावलीतील कारवाई सुरू असताना गो ग्रीन इको टेक सोल्यूशन प्रा. लि. उद्योग कोलवडे ग्रामपंचायत हद्दीतील एमआयडीसीच्या एस–७८ भूखंडावर स्थलांतरित करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. सुमारे २८०० चौ.मी. क्षेत्रफळ असलेल्या या भूखंडालगतच प्रसिद्ध मोरी खाडीचा मोठा नाला आहे.

याच परिसरात घरगुती घनकचरा व्यवस्थापन केंद्र सुरू करण्याची प्राथमिक हालचाल प्रशासनाकडून सुरू असून जिल्हा प्रशासनाने जागेची पाहणीही केली आहे. मात्र औद्योगिक क्षेत्रातील वाढते प्रदूषण, धोकादायक कचऱ्याची विल्हेवाट आणि मोरी खाडीची पर्यावरणीय संवेदनशीलता लक्षात घेता कोलवडे ग्रामस्थांनी ठाम विरोध दर्शविला आहे.

प्रतिक्रिया -

“घरगुती असो वा औद्योगिक—घनकचरा व्यवस्थापन केंद्राला आमचा ठाम विरोध आहे. प्रशासनाचा आडमुठेपणा सहन केला जाणार नाही. प्रसंगी आंदोलन उभारले जाईल.”

कुंजल संखे - सरपंच कोलवडे


वाढवण व मुरबा बंदर प्रकल्पांसाठी जनसुनावणी घेतली जाते, मग धोकादायक घनकचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी स्थानिकांची मते का विचारली नाहीत? असा सवाल कोलवडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच प्रिती पंकज यादव - संखे यांनी उपस्थित केला आहे.



प्रतिक्रिया - 

“घरगुती घनकचरा केंद्रालाही ग्रामस्थ विरोध करत असताना औद्योगिक घनकचऱ्याची विल्हेवाट त्याच परिसरात देणे ही गंभीर बाब आहे. जनसुनावणी घेत संभ्रम दूर करावा.”

डॉ सुभाष संखे - सचिव, सिटीझन फोरम बोईसर 

दरम्यान सरावली येथील भूखंडावर उभारण्यात आलेल्या गो ग्रीन इको टेक सोल्यूशन प्रा लि या उद्योगाच्या बांधकामाला जिल्हा प्राधिकरणाकडून परवानगी नसल्याचे स्पष्ट होत असून जमीन बिनशेती आदेशामध्ये देखील गोळ असल्याचे प्राथमिक माहितीनुसार स्पष्ट होत आहे तर महसूल व पर्यावरण विभागाकडून सुवर्णमध्य साधून या प्रदुषित गो ग्रीन उद्योगाला बेकायदेशीर परवानगी दिल्याचे निष्पन्न होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post