विद्यार्थ्यांचा प्रशासनाशी संवाद: ‘चला कार्यालय बघूया’ उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

*जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी उपक्रमाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला* 

पालघर जिल्हा (प्रतिनिधी) :–अमीन मेमन :– दिनांक २८ नोव्हेंबर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार अंतर्गत सर्व शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेला “चला कार्यालय बघूया” हा अभिनव उपक्रम सध्या मोठ्या उत्साहात सुरू असून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशासनाची ओळख करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम या उपक्रमातून साध्य होत आहे.चला कार्यालय बघूया’ उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी उपक्रमाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला 

प्रकल्पांतर्गत प्रत्येक शाळेला स्वतंत्र दिनांक देण्यात आला असून त्या दिवशी विद्यार्थी प्रकल्प कार्यालयाला भेट देतात. या दौऱ्यात विद्यार्थी कार्यालयातील विविध विभागांचे कामकाज, नोंदींची प्रक्रिया, शासन निर्णयांची अंमलबजावणी, तसेच दैनंदिन प्रशासकीय कामाची पद्धती यांचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत.

भेटीदरम्यान विद्यार्थी आपल्या शाळांशी संबंधित अडचणी, सुविधांची गरज आणि विविध सुधारणा थेट प्रकल्प अधिकाऱ्यांपुढे मांडतात. त्यामुळे शाळांमधील वास्तव परिस्थिती प्रशासनास अधिक स्पष्टपणे कळून येत असून त्यानुसार उपाययोजना करणे सुलभ होत असल्याचे प्रकल्प प्रशासनाने सांगितले.

हा उपक्रम केवळ प्रकल्प कार्यालयापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनसह इतर महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांनाही भेट देण्याची संधी दिली जात आहे. यामुळे शासनाच्या विविध यंत्रणांचे स्वरूप, कार्यपद्धती आणि प्रत्येक विभागाची जबाबदारी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाहता येत असून त्यांचा दृष्टीकोन व्यापक होत आहे.

या संदर्भात जव्हार प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी सांगितले की, “चला कार्यालय बघूया हा उपक्रम विद्यार्थ्यांना प्रशासनाची सखोल आणि वास्तवदर्शी ओळख करून देतो. भविष्यात त्यांच्या करिअर व वैयक्तिक विकासासाठी हा अनुभव निश्चितच सकारात्मक ठरणार आहे.”

आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावणारा हा उपक्रम शिक्षण क्षेत्रातील एक प्रेरणादायी आणि सकारात्मक पाऊल म्हणून व्यापक स्तरावर प्रशंसनीय ठरत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post