बोईसर प्रतिनिधी - विकास सिंह :–
बोईसर पूर्वेकडील अधिकारी रुग्णालयाजवळील टाटा हाऊसिंग परिसरातील महादेव फ्रूट अँड ज्यूस सेंटर येथे तयार करण्यात आलेल्या अनार ज्यूसमध्ये जिवंत अळ्या आढळल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. ग्राहकांनी ऑर्डर केलेल्या ज्यूसमध्ये अळ्या दिसताच एकच गोंधळ उडाला आहे.
याबाबत संबंधित दुकानदाराला जाब विचारण्यात आला असता त्याने दुर्लक्षपूर्ण उत्तर दिल्याने ग्राहक आणि दुकानदारामध्ये वादावादीचा प्रसंग निर्माण झाला. त्यानंतर शेजारील लाईफ लाईन रुग्णालयात सदर ज्यूसची तपासणी करण्यात आली असता अळ्या जिवंत असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असून पुन्हा एकदा बोईसर शहरासह आसपासच्या भागातील अन्न व औषध प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. विक्रेत्यांवर कोणत्याही प्रकारचा वचक नसल्याने अशा घटना घडत असून अन्न सुरक्षेबाबतचे नियम पाळले जात नसल्याचे नागरिकांचे मत व्यक्त केली जात आहेत.
घटनास्थळी अधिकृत कारवाई करण्यात येणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नसून अन्न व औषध प्रशासनाची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Tags
जिल्हा पालघर