रस्ते खोदकामातून निघणारे साहित्य गायब; बिटकॉन कंपनीवर ‘मोठा घोटाळा’ केल्याचा आरोप...

बिटकॉनची भंगार विक्रीतील भूमिका काय? बोईसर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

बोईसर (प्रतिनिधी) :– विकास सिंह :– बोईसर औद्योगिक क्षेत्रातील रस्ते व गटर बांधकामासाठी नियुक्त बिटकॉन कंपनीवर पुन्हा एकदा गैरव्यवहाराचे गंभीर आरोप समोर आले आहेत. कामादरम्यान गटारातील जुने लोखंडी चेंबर चोरी करून भंगारात विक्रीस पाठविल्याचा धक्कादायक आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. यामुळे कामाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गटारी व रस्त्यांच्या खोदकामादरम्यान मिळणारे लोखंडी साहित्य जसे की सळई, चेंबर, वायर इत्यादी सुरक्षितरित्या साठवण्याऐवजी काही कामगार गुपचूप ते हटवून भंगार विक्रेत्यांकडे विक्रीस पाठवीत आहेत. तसेच, रस्त्यांच्या उत्खननातून निघणारी मोठ्या प्रमाणातील मातीदेखील परवानगीशिवाय विक्री होत असल्याची चर्चा जोरात आहे.

या प्रकरणानंतर काही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत—

जुने चेंबर चोरी करून विकण्यात नेमका कोणाचा हात आहे?

भंगार विक्रीसाठी कोणती अधिकृत परवानगी घेतली आहे का?

खोदकामातून निघणाऱ्या साहित्याचा हिशेब कोणाकडे?

बिटकॉनकडे भंगार किंवा माती विक्रीसंदर्भात कोणते वैध दस्तऐवज आहेत?

यापूर्वी झालेल्या उत्खननातील साहित्याचा हिशेब अद्याप का जाहीर केला गेला नाही?

कामात वापरल्या जाणाऱ्या गौणखनिजावरची रॉयल्टी वसूल झाली आहे का?

यापूर्वीही बिटकॉन कंपनीच्या कामात निकृष्ट दर्जा व अनियमिततेच्या तक्रारी वारंवार समोर आल्या होत्या. मात्र, आता उघड झालेल्या नवीन आरोपामुळे कंपनीच्या कामकाजावर संशयाचे ढग दाटले आहेत.

स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागाने तात्काळ हस्तक्षेप करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. बोईसर परिसरात या विषयावर चर्चेला उधाण आले असून, या अनियमिततेतील जबाबदार कोण आणि कारवाई केव्हा? हा प्रश्न सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post