आम संघर्ष टाईम्स : वृत्तांत : राज्यात आज (2 डिसेंबर) विविध ठिकाणी नगरपालिका निवडणुकांसाठी मतदान पार पडत असताना उमेदवार आणि राजकीय पक्षांना धक्का देणारा मोठा निर्णय समोर आला आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार 3 डिसेंबरला मतमोजणी होणार होती, मात्र निवडणूक आयोगाने काही ठिकाणच्या निवडणुका रद्द करून सुधारित कार्यक्रम जाहीर केल्याने संपूर्ण परिस्थितीत बदल झाला.
धाराशिव नगरपालिकेतील तीन तसेच उमरगा नगरपालिकेतील तीन जागांच्या निवडणुकीवर अपील दाखल झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री उशिरा नवीन वेळापत्रक घोषित केले. त्यामुळे राज्यातील तब्बल 25 नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी सुधारित कार्यक्रम लागू करण्यात आले आहे. तसेच. मात्र या सुधारित आदेशात 2 डिसेंबरला झालेल्या मतदानाची मतमोजणी 3 डिसेंबरलाच घ्यावी की पुढे ढकलावी याबाबत स्पष्टता नसल्याने प्रशासन आणि उमेदवारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता.याच संदर्भात आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली आणि न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले की—
👉 आज (2 डिसेंबर) पार पडलेल्या मतदानासह 20 डिसेंबरला होणाऱ्या मतदानाच्या सर्व जागांची मतमोजणी एकत्रितपणे 21 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात येईल.
या निर्णयामुळे सर्व राजकीय पक्ष, उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये आश्चर्य आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. जवळपास तीन आठवड्यांनी होणारी मतमोजणी उमेदवारांच्या मानसिक तणावात भर घालणारी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
या बदलामुळे आता राज्यातील नगरपालिका निवडणुकांचा राजकीय ताप पुन्हा वाढणार असून 21 डिसेंबर हा निर्णयाचा दिवस ठरणार आहे.
Tags
धाराशिव जिल्हा