तलासरी ( प्रतिनिधी ) :– अशरफ खान :– दि. ०५/११/२५ जननायक बिरसा मुंडा सभागृह, जिल्हा परिषद पालघर येथे कुपोषण निर्मूलन, मातृ-शिशु पोषण सुधारणा आणि Nurture App च्या प्रभावी वापरासाठी उन्नत प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित आज करण्यात आली होती. कार्यशाळेला जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मनोज रानडे (भा.प्र.से.) यांनी भेट देत अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेचा उद्देश जिल्ह्यातील अंगणवाडी व्यवस्थापन, पोषण ट्रॅकिंग आणि मातृ-शिशु लाभ योजनांच्या अंमलबजावणीस अधिक गती देणे हा होता. यासाठी जिल्ह्यातील 12 ग्रामीण व 3 नागरी प्रकल्पांतील बालविकास प्रकल्प अधिकारी, मुख्य सेविका, पर्यवेक्षिका आणि विस्तार अधिकारी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी विभाग प्रमुखांकडून प्राप्त होणाऱ्या सूचनांची तात्काळ पूर्ण करून अपात्र लाभार्थ्यांची छाननी करून पात्र महिलांपर्यंत लाभ वेळेवर पोहोचवणे प्राधान्याने करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. स्तनदा व गरोदर मातांची अचूक माहिती संकलित करून नोंदण्या वाढवणे सोपे व आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दुसऱ्या अपत्यावर थांबण्यासाठी जनजागृती आणि प्रबोधन उपक्रम अधिक बळकट करण्याचे आवाहन त्यांनी केले.
नवीन अंगणवाडी बांधकामांच्या गुणवत्तेबाबत दक्षता घेण्याचा सल्ला देत बांधकामस्थळी स्वतः भेट द्यावी असे पर्वेक्षिकांना निर्देश दिले. यावेळी पालवी प्रकल्पाचे त्यांनी विशेष कौतुक करत हा उपक्रम जिल्ह्यात सर्वत्र प्रभावीपणे राबवण्याची अपेक्षा व्यक्त केली. ‘बाळाचे पहिले सुवर्णमय 1000 दिवस’ या महत्त्वाच्या उपक्रमाची काटेकोर अंमलबजावणीही त्यांनी अधोरेखित केली.
कार्यशाळेत Nurture App अद्ययावत नोंदी, पोषण ट्रॅकरवरील प्रकल्पनिहाय सद्यस्थिती, कुपोषणग्रस्त बालकांची स्थिती, VCDC/UCDC तसेच NRC दाखल बालकांसाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली. बालविकास प्रकल्प अधिकारी डहाणू सतीश पोळ यांनी सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना प्रकल्पनिहाय सखोल प्रशिक्षण दिले.
कार्यक्रमास जिल्हा कार्यक्रम अधिकारी व्ही. एम. हुंडेकर, पालघरचे बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल पवार, पालवी प्रकल्पाचे तुषार मराड, तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यात मातृ-शिशु कल्याण, पोषण स्थिती सुधारणा आणि डिजिटल ट्रॅकिंग प्रणाली अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा अत्यंत ठळक आणि परिणामकारक ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
Tags
जिल्हा पालघर