ऑनलाईन :– बोईसर (प्रतिनिधी) :– अशरफ खान :– महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे (MSRLM) मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांनी आज पालघर तालुक्यातील स्वामिनी उद्योग समूह, BRC/SVEP केंद्र तसेच वडराई येथील मासे विक्री उत्पादक गटाला प्रत्यक्ष भेट दिली आणि कार्यपद्धतीचा सखोल आढावा घेतला.
स्वामिनी उद्योग समूहाच्या भेटीदरम्यान निलेश सागर यांनी उत्पादन प्रक्रिया, विक्रीची सद्यस्थिती, नफा-तोटा तक्ता, महिलांचा सहभाग, गुणवत्ता, पॅकेजिंग व ब्रँडिंग यांची बारकाईने पाहणी केली. उत्पादनाची सातत्यता टिकवून स्थानिक तसेच जिल्हा व राज्य पातळीवर बाजारपेठ विस्तार करण्याचे निर्देश दिले. महिला बचतगटांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या सूचना केल्या.
तद्नंतर BRC/SVEP केंद्राला भेट देऊन स्वयंरोजगार व उद्योजकता विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण उपक्रमांचा आढावा घेतला. स्वरोजगारासाठी इच्छुक लाभार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण, आर्थिक सहाय्य, मार्गदर्शन व बाजारपेठ जोडणी यावर अधिक भर देण्याबाबत तसेच सूचनांची त्वरित अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.
वडराई येथील मासे विक्री उत्पादक गटाच्या भेटीत दैनंदिन विक्री पद्धती, साठवण क्षमता, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था व उत्पन्नाची स्थिती यांची पाहणी केली. व्यवसाय अधिक शाश्वत व फायदेशीर करण्यासाठी आवश्यक सुविधा, स्वच्छता मानके, साठवणूक व्यवस्था तसेच थेट ग्राहक संपर्क वाढविण्याबाबत मार्गदर्शन केले.
दुपारनंतर जिल्हा परिषद हुतात्मा सभागृह येथे झालेल्या जिल्हा आढावा बैठकीत विविध योजनांची प्रगती, उद्दिष्टपूर्ती, लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोच, SMART उपक्रम तसेच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा सविस्तर आढावा घेऊन आवश्यक सूचना देण्यात आल्या.
या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रानडे, अतिरिक्त उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक डॉ. सातपुते, गट विकास अधिकारी संजय भोये, सहाय्यक गट विकास अधिकारी बापूराव नाळे, DMM रवी बोबडे तसेच सर्व तालुका मिशन मॅनेजर, ब्लॉक मिशन मॅनेजर व कम्युनिटी को-ऑर्डिनेटर उपस्थित होते.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना, स्वयंरोजगाराला प्रोत्साहन व गटांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा ठरला.
Tags
जिल्हा पालघर