पालघर बोईसर (प्रतिनिधी) :– अशरफ खान :–
दिनांक : 10/12/2025 जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांग मुलांसाठी आयोजित क्रीडा स्पर्धा आज आर्यन हायस्कूल मैदानावर उत्साहात पार पडल्या. पालघर जिल्ह्यातील १६ शाळांतील २३६ विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये जोशपूर्ण सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे, पोलिस उपनिरीक्षक प्रभा राऊळ, जिल्हा कार्यक्रम अधिकारी व्यंकटराव हुंडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉ. प्रकाश हसनाळकर यांच्या नियोजनाखाली या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी मार्चपास करून मान्यवरांना सलामी दिली, तर जिल्हाधिकाऱ्यांनी क्रीडा ज्योत प्रज्वलित करून स्पर्धांचा शुभारंभ केला.मान्यवरांच्या उपस्थितीत क्रीडा शपथ घेण्यात आली.
धावणे, पळत येऊन लांब उडी, जागेवरून लांब उडी, गोळाफेक, स्पॉट बॉल थ्रो अशा विविध क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यांनी उत्साहाने आपले कौशल्य सादर केले.
उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड म्हणाल्या,
“जिल्हा परिषद सेस फंडातून शेवटच्या घटकासाठी राबवला जाणारा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे. दिव्यांग मुलांच्या शिक्षकांचे विशेष कौतुक केले पाहिजे. आपल्या अडचणींवर मात करून मैदानावर उभे राहणे हेच तुमचे खरे यश आहे. अशा स्पर्धा मुलांच्या क्षमतेला दिशा देतात आणि ही मुले समाजासाठी प्रेरणादायी ठरतात. आम्ही अशा उपक्रमांना शासनाच्या माध्यमातून अधिक व्यापक करण्यासाठी प्रयत्नशील राहू.”
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले,
“या स्पर्धा दिव्यांग मुलांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या उपक्रमांमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि सामाजिक जडणघडण मजबूत होते. जिल्हा परिषद अशा उपक्रमांना पुढील काळातही प्राधान्य देईल.”
यावेळी कर्णबधिर व मूकबधिर विद्यार्थ्यांच्या पूर्वी झालेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रकाश हसनाळकर यांनी केले. सर्व शिक्षकवृंद, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
जिल्हा पालघर