मौजे जळकोट (ता. तुळजापूर) — ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत काल अचानक मोठी राजकीय हलचल पाहायला मिळाली. उपसरपंच श्री. प्रशांत नवगिरे यांनी सादर केलेल्या राजीनाम्याचा विषय सभेच्या सुरुवातीलाच समोर येताच सदस्यांमध्ये एक मताने राजीनामा मंजूर करण्यात आला
दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता झालेल्या या सभेत राजीनामा हा प्रमुख मुद्दा ठरला. सदस्यांनी राजीनाम्याचे कारण, अलीकडील वादग्रस्त घडामोडी आणि ग्रामपंचायतीत निर्माण झालेल्या तणावाची सविस्तर चर्चा केली.
सरपंच श्री. गजेंद्र कदम पाटील यांनी उपसरपंच पदावरील कामकाज, जबाबदाऱ्या आणि ताज्या परिस्थितीची माहिती सभेसमोर मांडत राजीनाम्याची शहानिशा केली. चर्चेनंतर सरपंच गजेंद्र कदम पाटलांनी नवगिरे यांचा राजीनामा मंजूर करण्याचा निर्णय जाहीर केला.
या निर्णयानंतर ग्रामपंचायतीच्या पुढील राजकीय समीकरणांची चर्चा गावभर सुरू झाली आहे. उपसरपंचपद रिक्त झाल्याने नव्या नियुक्तीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येणाऱ्या काळात ग्रामपंचायतीच्या धोरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ग्रामपंचायतीत अलीकडेच वाढलेल्या तणावयुक्त वातावरणामुळे हा राजीनामा अनेकांसाठी अपेक्षित होता, तर नवगिरे साठी धक्का देणारा ठरला आहे. गावाच्या राजकारणात यामुळे विकास कामे अधिक गतिमान होणार, अशी चर्चा सामाजिक स्तरावर रंगू लागली आहे.
सभेच्या शेवटी सरपंच श्री. गजेंद्र कदम पाटील यांनी ग्रामविकासाच्या गतीसाठी सर्व सदस्यांनी सहकार्याने काम करावे, असे आवाहन केले.
Tags
जिल्हा धाराशिव