मतदार यादी विशेष पुनरिक्षण**कार्यक्रम १० दिवसांची मोहीम* धाराशिवमध्ये कडक अंमलबजावणी


धाराशिव,दि.१७ मार्च (जिमाका) भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लवकरच मतदार याद्यांचे विशेष पुनरिक्षण कार्यक्रम (SIIR) राज्यात सुरू होणार आहे.त्याअनुषंगाने मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाने पूर्वतयारीचे निर्देश दिले आहेत.तसेच मुंबई येथे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या बैठकीत यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

या चर्चेनुसार ऑक्टोबर २०२४ च्या मतदार यादीतील मतदारांचे सन २००२ च्या मतदार यादीशी मॅपींग करणे,अस्पष्ट (Blur Photo) असलेल्या मतदारांचे नवीन रंगीत फोटो गोळा करून अद्यावत करणे, तसेच DSE नोंदीची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही करणे,ही कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

त्या अनुषंगाने जिल्ह्यातील
२४०- उमरगा,२४१-तुळजापूर, २४२-उस्मानाबाद व २४३-परंडा या विधानसभा मतदारसंघांतील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व केंद्रस्तरीय पर्यवेक्षक (BLO Supervisor) यांना वरील कामकाजासाठी २० मार्च २०२६ ते २९ मार्च २०२६ या कालावधीत पूर्णवेळ कार्यमुक्त करण्यात आले आहे.तसेच या कालावधीत ज्यांची दहावी व बारावी परीक्षेसाठी नियुक्ती आहे,अशा BLO व पर्यवेक्षकांनी संबंधित दिवशी परीक्षा कार्य पूर्ण करून दुसऱ्या दिवशी मतदार यादीचे कामकाज पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे.

दरम्यान,या कामकाजाकडे दुर्लक्ष किंवा टाळाटाळ केल्यास संबंधितांवर लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे. अन्यथा कलम १३४ अंतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल,याची गांभीर्याने नोंद घ्यावी,असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post