‘आई राजा उदो-उदो’च्या गजरात तुळजापूर दणाणले; चैत्री पौर्णिमेला भाविकांचा उसळला महासागर



 तुळजापूर (प्रतिनिधी) आम संघर्ष टाइम्स online 

कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या चैत्री पौर्णिमा यात्रेनिमित्त तुळजापूर शहरात भाविकांची मोठी गर्दी उसळली असून ‘आई राजा उदो-उदो’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. गुढीपाडव्यापासून यात्रेला प्रारंभ झाला असला तरी यावर्षी सुरुवातीला भाविकांची संख्या तुलनेने कमी असल्याचे दिसून आले होते. मात्र २ एप्रिल रोजी चैत्री पौर्णिमेनिमित्त भाविकांचा महापूर उसळला.

शहरातील भवानी रोड, महाद्वार रोडसह सर्व प्रमुख मार्गांवर भाविकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. मंदिराच्या गाभाऱ्यात आणि परिसरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विविध संस्था, मंडळे आणि प्रतिष्ठानांच्या वतीने भाविकांसाठी मोफत अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली होती.

यंदाच्या यात्रेत सुरुवातीच्या काळात अपेक्षित गर्दी नसल्याने व्यापारी वर्गात निराशेचे वातावरण होते. दुकानदारांनी यात्रेसाठी विशेष तयारी करून दुकाने सजवली होती; मात्र गतवर्षीच्या तुलनेत ग्राहकांची संख्या कमी असल्याने ‘चैत्री पौर्णिमा फेल’ गेल्याची चर्चा व्यापाऱ्यांमध्ये रंगली. तरीही पौर्णिमेच्या दिवशी आणि त्यानंतर भाविकांची वाढती गर्दी पाहता व्यापारात काही प्रमाणात हालचाल सुरू झाली आहे.

चैत्री पौर्णिमेनिमित्त बाहेरगावाहून आलेले छोटे-मोठे व्यापारी व फेरीवाले शहरात मोठ्या संख्येने दाखल झाले असून पार्किंग परिसर आणि मुख्य रस्त्यांवर त्यांची गर्दी दिसून येत आहे. भाविक तुळजाभवानीचे दर्शन घेऊन येरमाळा येथील येडाई देवीच्या दर्शनासाठीही जात असल्याने ३ व ४ एप्रिल रोजीही गर्दी कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. घोडेगाव (जि. अहिल्यानगर) येथील उद्योजक संजयकुमार मचे परिवाराच्या वतीने विविध प्रकारच्या फुलांनी देवी तसेच हनुमान जयंतीनिमित्त हनुमानाची प्रतिकृती साकारण्यात आली. यावेळी पुजारी राम छत्रे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली असून मंदिर संस्थानच्या वतीने मचे कुटुंबाचा सत्कार करण्यात आला.

यात्रेदरम्यान ढोल-ताशे, संबळांच्या गजरात भाविक भक्तिभावाने नाचत देवी दर्शनासाठी जाताना दिसून आले. विशेषतः आराधी महिला, तृतीयपंथी आणि ग्रामीण भागातील भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लक्षवेधी ठरली. देवीच्या गाण्यांवर नाचणाऱ्या आराधी महिलांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

Post a Comment

Previous Post Next Post