तुळजाभवानीच्या इनामी जमिनींची सखोल चौकशी; आठवडाभरात समिती स्थापन होणार – जिल्हाधिकारी पुजार

तुळजापूर (प्रतिनिधी) :- सुरज थोरात
 तुळजापूर येथील लाखो हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या हजारो एकर इनामी जमिनींच्या कथित अनधिकृत हस्तांतरण व विक्री प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पुढील आठवड्यात विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर उपस्थित होते. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी समिती नेमून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

जिल्हाधिकारी पुजार म्हणाले की, तत्कालीन निजाम सरकारने श्री तुळजाभवानी देवीच्या सेवेसाठी विविध मठांना काही अटी व शर्तींसह मोठ्या प्रमाणात इनामी जमीन दिली होती. मात्र या जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावर मंदिर संस्थानचे नाव नसल्याचे प्राथमिक पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

चौकशी समितीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असेल. जमीन प्रदान करताना घालण्यात आलेल्या अटींचे पालन झाले आहे की नाही, तसेच जमीन हस्तांतरण, फेरफार नोंदी आणि मालकी हक्कातील बदल कायदेशीर प्रक्रियेनुसार झाले आहेत का, याची तपासणी केली जाणार आहे. प्रकरणातील गुंतागुंत लक्षात घेऊन सर्व बाबींचा बारकाईने अभ्यास केला जाईल, असेही पुजार यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र मंदिर महासंघाने केलेल्या तक्रारीनुसार, श्री तुळजाभवानी संस्थानच्या नावे कागदोपत्री हजारो एकर जमीन असताना तिचा प्रत्यक्ष ताबा काही खाजगी व्यक्तींकडे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच जगदंबा न्यास व इतर संस्थांच्या मालकीच्या जमिनींचे कथितरित्या खाजगी नावे हस्तांतरण, फेरफार नोंदी आणि संरक्षित कुळाच्या तरतुदींचा गैरवापर झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या गंभीर आरोपांची राज्य शासनाने दखल घेतल्याने आता या चौकशीतून नेमके काय निष्पन्न होते, याकडे तुळजापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचे लक्ष लागले आहे. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणातील पुढील कारवाईचा मार्ग निश्चित होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post