धाराशिव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय, नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराचा शुभारंभ आज मान्यवरांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात झाला.
लोकनेते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष, जिल्हा धाराशिव यांच्या वतीने आयोजित या शिबिरामध्ये विविध आजारांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, वैद्यकीय सल्ला आणि आवश्यक उपचार उपलब्ध करून दिले जात आहेत. तसेच गंभीर आजारांचे निदान झालेल्या गरजू रुग्णांवर तेरणा हॉस्पिटल, नेरुळ येथे पुढील उपचार मोफत करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
पावसाचे वातावरण असूनही जिल्हाभरातील नागरिकांनी या शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांनी आरोग्य तपासणी करून घेतली. नागरिकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे असे महाआरोग्य शिबिर दरवर्षी आयोजित करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.
शिबिराच्या प्रारंभी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच रक्तदान शिबिरालाही नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत अनेक रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.
कन्या शाळा मल्टिपर्पज मैदान, धाराशिव येथे दिवसभर सुरू असलेल्या या महाआरोग्य शिबिराचा लाभ जिल्ह्यातील गरजू नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्व रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, मराठवाडा संयोजक नितीन काळे, नगराध्यक्षा नेहाताई राहुल काकडे, तेरणा ट्रस्टचे विश्वस्त अशोकभाऊ शिंदे, विजेंद्र अण्णा चव्हाण, सतीश दंडनाईक, देशमुख सर, अनिल काळे, खंडेराव चौरे, संपतराव डोके, नितीन भोसले, अभय इंगळे, पंचायत समिती सभापती गोकर्णाताई कदम, उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे, नगर परिषद सभापती अभिजीत काकडे, प्रवीण माळी, आकाश तावडे, विलास लोंढे, जिल्हा परिषद सदस्य दयानंद शिंदे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन दिनेश देशमुख, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, धनंजय पाटील, सुशांत सोनावणे, कुणाल निंबाळकर, गोपाळ कदम, मनोज देशमुख, प्रशांत रणदिवे, विद्याताई माने यांच्यासह तेरणा वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जिल्हाभरातून आलेले असंख्य नागरिक उपस्थित होते.
Tags
जिल्हा धाराशिव