तुळजापूर (प्रतिनिधी) : तुळजापूर पोलीस ठाण्यात घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर विविध स्तरांतून चर्चा सुरू झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते पंकज शहाणे यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यातच एक व्हिडिओ तयार करून पोलीस निरीक्षक मांजरे यांनी आपल्याशी अवमानकारक भाषेत संवाद साधल्याचा आरोप केला आहे. तसेच पंकज शहाणे हे भावनिक अवस्थेत दिसत असून, आपण सामाजिक कार्यातून बाजूला होत असल्याचे सांगत स्वतःच्या गालावर थपडा मारताना दिसत आहेत. या व्हिडिओमुळे तुळजापूर शहरासह परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
शहाणे यांनी व्हिडिओत पोलीस निरीक्षकांकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा दावा केला असून, या घटनेमुळे सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, काही नागरिकांनी संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाबाबत पोलीस प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. तसेच व्हिडिओतील आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नसून संबंधित घटनेची सत्यता आणि नेमकी पार्श्वभूमी समोर येणे बाकी आहे.
या घटनेमुळे सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासन यांच्यातील संवाद व समन्वयाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, पुढील घडामोडीकडे तुळजापूर शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Tags
तुळजापूर विशेष