NEET पेपर लीक प्रकरणात लातूरच्या शिक्षणक्षेत्राला धक्का; शिवराज मोटेगावकरांना बेड्या

 लातूर :-(प्रतिनिधी):-  देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई करत लातूर येथील प्रसिद्ध ‘रेणुकाई करिअर सेंटर’ (RCC) चे संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर (वय 47) यांना पुण्यातून अटक केली आहे. रविवारी (17 मे) सायंकाळी सीबीआयने ही धडक कारवाई केली असून, त्यांच्या अटकेमुळे राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
सीबीआयच्या तपासानुसार, मोटेगावकर हे नीट पेपर लीक करणाऱ्या संघटित टोळीचे सक्रिय सदस्य असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, त्यांनी 23 एप्रिल रोजीच नीट परीक्षेचे प्रश्न व उत्तरे मिळवली होती. ही लीक झालेली प्रश्नपत्रिका त्यांनी काही संशयित व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना पुरवल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.
या प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाल्याचे उघड झाले आहे. परीक्षा संपल्यानंतर पुरावे मिटवण्यासाठी प्रश्नपत्रिका नष्ट करण्यात आल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. तसेच, चौकशीदरम्यान संबंधित विद्यार्थ्यांची नावे सांगण्यास मोटेगावकर यांनी टाळाटाळ केल्याचेही सीबीआयने नमूद केले आहे.
यापूर्वी 14 मे रोजी सीबीआयने लातूर येथील त्यांच्या निवासस्थानी झडती घेतली होती. त्या वेळी त्यांच्या मोबाईल फोनमध्ये परीक्षेचे लीक झालेले प्रश्न आढळून आल्याची माहिती समोर आली होती. कारवाईदरम्यान सीबीआयने विविध कागदपत्रे, ओळखपत्रे आणि बँकांचे डेबिट कार्ड जप्त केले आहेत.
या गंभीर प्रकरणात मोटेगावकर यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS), भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा तसेच सार्वजनिक परीक्षा (अनुचित प्रकारांना प्रतिबंध) कायदा, 2024 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर फसवणूक, गुन्हेगारी कट रचणे आणि परीक्षेतील गैरप्रकारांना खतपाणी घालण्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत.
दरम्यान, सीबीआयकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post