तुळजापूर | प्रतिनिधी :- कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे जागृत तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूर तालुक्यात प्रस्तावित विमानतळ उभारणीच्या प्रकल्पाला महत्त्वाची गती मिळाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) च्या नुकत्याच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला तत्त्वतः मंजुरी देत आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश MADC चे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांना दिले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर स्वतः लक्ष ठेवत संबंधित यंत्रणांना आवश्यक कार्यवाही वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याने तुळजापूर विमानतळाच्या उभारणीची प्रक्रिया प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे वाटचाल करत आहे.
दरम्यान, या प्रकल्पाच्या पाठपुराव्यासाठी नुकतीच नवी दिल्ली येथे भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली होती. या बैठकीत विमानतळाच्या तांत्रिक, प्रशासकीय आणि व्यवहार्यता विषयक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामुळे प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेला अधिक बळ मिळाले आहे.
प्रस्तावित विमानतळामुळे तुळजापूरसह पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, येरमळा, कुंथलगिरी आणि तेर या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना हवाई संपर्क उपलब्ध होणार आहे. यामुळे देशभरातील भाविकांना या तीर्थक्षेत्रांपर्यंत जलद, सुरक्षित आणि सुलभ प्रवास करता येणार असून धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल.
याचबरोबर हॉटेल व्यवसाय, वाहतूक, व्यापार, सेवा क्षेत्र आणि स्थानिक रोजगारनिर्मितीला मोठी संधी उपलब्ध होणार आहे. तुळजापूर तालुक्यात प्रस्तावित 'तारा' (TARA) प्रकल्पालाही या विमानतळाचा मोठा लाभ होणार असून, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग तसेच सुरत–चेन्नई व शक्तिपीठ ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गाशी हवाई संपर्काची जोड मिळाल्याने उद्योग, लॉजिस्टिक्स, गुंतवणूक, निर्यात आणि सेवा क्षेत्रासाठी हा परिसर अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
मराठवाड्याच्या विकासाला नवी दिशा
तुळजापूर विमानतळ प्रकल्प हा केवळ विमानतळ उभारणीपुरता मर्यादित नसून धाराशिव, बीड, लातूर तसेच सोलापूर जिल्ह्यांच्या धार्मिक, औद्योगिक, पर्यटन आणि कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला दीर्घकालीन दिशा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत आशावादी वातावरण निर्माण झाले असून, या निर्णयाबद्दल विविध स्तरांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
Tags
तुळजापूर विशेष