पालघर जिल्हा (प्रतिनिधी) :– अमीन मेमन :– दिनांक २६ डिसेंबर : राज्यातील शालेय क्रीडा चळवळीला नवी उंची देणारी “शालेय राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धा २०२५–२६” पालघर जिल्ह्यात भव्य स्वरूपात होत असून, या स्पर्धेचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पालघर व जिल्हा क्रीडा परिषद, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. ही प्रतिष्ठेची स्पर्धा २६ ते २८ डिसेंबर २०२५ दरम्यान डॉ. पांडुरंग वामन अमृते शिक्षण संस्था, सफाळे येथे पार पडणार आहे.
या राज्यस्तरीय स्पर्धेत मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, लातूर, कोल्हापूर आणि पुणे या विभागांतील १९ वर्षाखालील मुले व मुली शालेय खेळाडू सहभागी होणार आहेत. राज्यातील होतकरू आणि उदयोन्मुख खेळाडूंना आपले क्रीडाकौशल्य सादर करण्याची तसेच उच्च पातळीवर स्वतःची ओळख निर्माण करण्याची ही सुवर्णसंधी ठरणार आहे.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आज नियोजन बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष इंद्रजीत नितनवार, तांत्रिक समिती अध्यक्ष अशोक सरोदे, निवड समिती सदस्य विनीत सकपाळ, ऋषिकेश राऊळ, सायमा बागवान, राज्य समन्वयक प्रीतीश पाटील, प्राचार्या मधुमती कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुचिता पाटील, क्रीडा शिक्षक रमाकांत घरत व क्रीडा शिक्षिका प्रियंका पाटील यांच्यासह नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी डॉ. अमृते शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम करांडे, उपाध्यक्ष विलास पाटील, माजी उपमुख्याध्यापक राजन घरत, शारीरिक शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील आणि जिल्हा समन्वयक आशिष पाटील यांनी उपस्थित राहून मौल्यवान मार्गदर्शन केले.
ही स्पर्धा केवळ खेळापुरती मर्यादित न राहता शिस्त, संघभावना आणि क्रीडासंस्कृती घडविणारी ठरेल. ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देत शालेय क्रीडा चळवळीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी व्यक्त केला.
Tags
जिल्हा पालघर