तुळजापुरात शाकंभरी नवरात्रोत्सवाला घटस्थापनेने उत्साहात सुरुवात


तुळजापूर | प्रतिनिधी : आम् संघर्ष टाईम्स online तुळजाभवानी देवींच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास घटस्थापनेने भक्तिमय प्रारंभ
श्री तुळजाभवानी देवींच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास आज घटस्थापनेने भक्तिमय व मंगल वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला. दुपारी बारा वाजता मुख्य यजमान उल्हास अनंतराव कागदे यांच्या हस्ते मंदिरातील गणेश विहारात सपत्नीक विधीवत घटस्थापना करण्यात आली. यानिमित्ताने सात दिवस चालणाऱ्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाची अधिकृत सुरुवात झाली.
या धार्मिक विधीप्रसंगी तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, उपाध्ये सुनीत (बंडू) पाठक, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, अमराराजे कदम, अनंत कोंडो, लेखाधिकारी संतोष भेंकी, सहायक धार्मिक व्यवस्थापक अनुप ढमाले, रामेश्वर वाले यांच्यासह मंदिर संस्थानचे अधिकारी, कर्मचारी, पुजारी बांधव व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्रोच्चार, विधी व भक्तीभावाने संपूर्ण मंदिर परिसर मंगलमय झाला होता.
श्री तुळजाभवानी देवींचे दरवर्षी दोन प्रमुख उत्सव साजरे केले जातात. अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र उत्सव व पौष महिन्यातील शाकंभरी नवरात्र उत्सव हे त्यातील महत्त्वाचे उत्सव आहेत. तुळजापुरात शाकंभरी नवरात्र उत्सवाला ‘धाकटा दसरा’ म्हणूनही ओळखले जाते.
यापूर्वी गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेली श्री तुळजाभवानी देवींची मंचकी निद्रा आज पहाटे पौष शुक्ल अष्टमीच्या शुभमुहूर्तावर संपविण्यात आली. त्यानंतर देवींची सिंहासनावर विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली.
सात दिवस चालणाऱ्या या शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सांगता ३ जानेवारी रोजी शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी दुपारी बारा वाजता पूर्णाहुती व त्यानंतर घटोत्थापनाने होणार आहे.
नवरात्र महोत्सव काळात देवींच्या विविध अलंकार महापूजा पुढीलप्रमाणे संपन्न होणार आहेत —
२९ डिसेंबर: रथ अलंकार महापूजा
३० डिसेंबर: मुरली अलंकार महापूजा
३१ डिसेंबर: शेषशाही अलंकार महापूजा व सकाळी ७ वाजता जलयात्रा
१ जानेवारी: भवानी तलवार अलंकार महापूजा
२ जानेवारी: महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा
तसेच शाकंभरी नवरात्र काळात दररोज रात्री श्री तुळजाभवानी देवींचा छबीना (मिरवणूक) निघणार आहे. या पवित्र नवरात्र उत्सवामुळे संपूर्ण तुळजापूर नगरी भक्ती, श्रद्धा व उत्सवाच्या वातावरणाने भारावून गेली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post