तलासरी (प्रतिनिधी) :–अशरफ खान :– मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यात दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये एकाच वेळी “घरकुल लाभार्थी संवाद अभियान – टप्पा ३” अंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुलांचा गृहप्रवेश कार्यक्रम तसेच लाभार्थी संवाद अभियान राबविण्यात आले.
15000 घरकुकांची कामे सुरू न केलेल्या लाभार्थ्यांना आज भेटी देण्यात आल्या. तसेच सायंकाळी 4 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार 4500 घरकुलांचा गृहप्रवेश कार्यक्रम पार पडला.
या जिल्हास्तरीय अभियानांतर्गत मोखाडा पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत साखरी येथे आयोजित कार्यक्रमास आमदार हरिश्चंद्र भोये तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी प्रत्यक्ष उपस्थिती लावली. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निकम, सरपंच, पंचायत समितीचे खाते प्रमुख, गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी तसेच संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) तसेच प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (PM-JANMAN) अंतर्गत मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी, समस्या जाणून घेणे, घरकुल बांधकाम वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याबाबत मार्गदर्शन करणे व लाभार्थ्यांना प्रोत्साहन देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
मोखाडा येथील कार्यक्रमात पूर्ण झालेल्या घरकुलांचा गृहप्रवेश करण्यात आला. लाभार्थ्यांशी संवाद साधताना उपस्थित मान्यवरांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ वेळेत घेऊन घरकुल बांधकामाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, महिला सक्षमीकरण उपक्रमांतर्गत याच दिवशी जिल्ह्यात विविध ठिकाणी महिला स्वयंसहायता गट सदस्य, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका व महिला बचत गट सदस्य यांची हिमोग्लोबिन (HB) तपासणी व आरोग्य तपासणी आयोजित करण्यात आली. मोखाडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र भाताने येथे हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला. महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती करणे व अनिमिया मुक्त गाव संकल्पना बळकट करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या संपूर्ण जिल्हास्तरीय अभियानाचे नियोजन व अंमलबजावणी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका डॉ.रूपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांच्या सूचनांनुसार सर्व पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर समन्वयाने काम करून अभियान यशस्वी करण्यात आले.
Tags
जिल्हा परिषदेच्या