पालघर तलासरी (प्रतिनिधी) :– अशरफ खान :–
कासा–सायन उधवा ते तलासरी–संजान या अत्यंत महत्त्वाच्या महामार्गाचे नूतनीकरण व काँक्रीटकरणाचे काम सध्या सुरू असताना, उधवा कानलपाडा परिसरातच कामाच्या पहिल्याच टप्प्यात नवीन काँक्रीट रस्त्यावर तडे व भेगा पडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराच्या कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
उधवा परिसरात गेल्या महिन्यापासून नवीन काँक्रीट रस्त्याचे काम सुरू असून काही भागातील काम पूर्ण झाले आहे. मात्र काम पूर्ण होत असतानाच तसेच काही ठिकाणी काम सुरू असतानाच रस्त्यावर तडे व भेगा पडू लागल्याने हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
या रस्त्याच्या कामादरम्यान यापूर्वीही ग्रामस्थांकडून अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. कामाच्या ठिकाणी आवश्यक असलेले सूचना फलक, सुरक्षा फलक, रेडियम रिबीन तसेच अपघात टाळण्यासाठीची योग्य व्यवस्था नसल्यामुळे अनेक वेळा अपघात घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत वारंवार तक्रारी व विनवण्या करूनही संबंधित ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
आता नव्याने काँक्रीट केलेल्या रस्त्यातच तडे पडल्याचे स्पष्ट झाल्याने ग्रामस्थांचा संताप अधिक तीव्र झाला आहे. या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाकडूनही दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे.
प्रतिक्रिया
“रस्त्याचे काँक्रीटीकरण अत्यंत निकृष्ट दर्जाच्या पद्धतीने होत आहे. काँक्रीटचे मिश्रणही निकृष्ट दर्जाचे वापरण्यात येत असून, खाली खडी व दगड न टाकता थेट मातीवर रोलर फिरवून त्यावर काँक्रीट टाकले जात आहे. त्यामुळे रस्त्यावर लहान-मोठ्या भेगा व तडे पडत आहेत. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असून ठेकेदारावर तात्काळ कारवाई करावी.”
— देवराम कुरकुटे, ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते
“मोठ्या प्रमाणावर काँक्रीटीकरणाचे काम सुरू असताना काही ठिकाणी हलके क्रॅक्स येतात. मात्र अशा ठिकाणी पुन्हा दुरुस्ती करून किंवा तो भाग काढून नव्याने काम करण्यात येणार आहे.”
— गुलशन मीना, प्रोजेक्ट मॅनेजर
Tags
जिल्हा पालघर