थंडीच्या दिवसांत मायेची ऊब; डहाणूत ५००हून अधिक गरजूंना उबदार ब्लँकेटचे वाटप

 तलासरी (प्रतिनिधी) :– अशरफ खान :– थंडीच्या तीव्रतेमुळे ग्रामीण भागातील गरीब, गरजू व आदिवासी बांधवांचे हाल होऊ नयेत, या सामाजिक जाणिवेतून मुंबई येथील दानशूर व्यक्ती दिपक भेदा व गिरीष भेदा या बंधूंच्या पुढाकारातून डहाणू तालुक्यात मायेची ऊब देणारा उपक्रम राबवण्यात आला. पिंपळशेत, निकणे, शेल्टी व गंजाड या परिसरात सुमारे ५०० पेक्षा अधिक उबदार ब्लँकेटचे मोफत वाटप करून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून देण्यात आले.

वाढत्या थंडीमुळे आदिवासी व कष्टकरी समाजातील नागरिकांना उबदार आधार मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. गावोगावी जाऊन गरजू कुटुंबांची प्रत्यक्ष भेट घेत कपडे व ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे परिसरात समाधान, आपुलकी व आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या सामाजिक उपक्रमास विनोद नंदू (हिरल फार्म मॅनेजर), गंजाड सरपंच अभिजीत देसक, उपसरपंच कौशल कामडी, निकणे उपसरपंच सुदाम मेरे, ग्रामपंचायत सदस्य अजय घाटाळ, सामाजिक कार्यकर्ते प्रविण वरठा, सुधीर घाटाळ, रुपेश वायेडा, हितेश इभाड, रामदास चव्हाण, अजित चव्हाण, अनंता दळवी यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमातील उपस्थित मान्यवरांनी भेदा बंधूंच्या सामाजिक जाणिवेचे कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे समाजातील गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचतो, असे मत व्यक्त केले. भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी बोलताना विनोद नंदू यांनी समाजप्रबोधनाचा संदेश देत भेदा बंधूंच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. तर सरपंच अभिजीत देसक यांनी दात्यांकडून मिळणाऱ्या वस्तूंचा योग्य वापर करणे गरजेचे असल्याचे सांगत, पुढील काळातही विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून असे उपक्रम राबवण्याचा मानस व्यक्त केला. या उपक्रमाबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी आयोजक व सर्व सहकाऱ्यांचे आभार मानत, अशा समाजोपयोगी कार्यामुळे परिसरात सकारात्मक संदेश पोहोचत असल्याची भावना व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post