*तलासरी (प्रतिनिधी) :– अशरफ खान*:– शेतकऱ्यांच्या शेतीकामात सुलभता आणून उत्पादनवाढीस चालना देणाऱ्या शासनाच्या सामाजिक उपक्रमांतर्गत प्रधान मंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत छोटे ट्रॅक्टर व भात झोडणी मशीनचे वितरण बुधवार, दि. ०७ जानेवारी रोजी ग्रामपंचायत वसा येथे करण्यात आले. पाणलोट समितीच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमाला डहाणू विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद निकोले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार निकोले यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे श्रम कमी व्हावेत आणि शेती अधिक फायदेशीर व्हावी, यासाठी शासन विविध योजना प्रभावीपणे राबवत आहे. छोटे ट्रॅक्टर व भात झोडणी मशीनमुळे शेतीची कामे कमी वेळेत आणि कमी खर्चात पूर्ण होतील. परिणामी, शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सरपंच वंदना गडग यांनी ग्रामपंचायत वसा व पाणलोट समितीच्या वतीने शासनाचे आभार मानले. या योजनेमुळे गावातील शेती आधुनिक होत असून शेतकऱ्यांना थेट लाभ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी समाज कल्याण सभापती रामू पागी, जिल्हा जलसंधारण अधिकारी दिलीप पाडवी, संदीप राऊत, रुपेश सावर्डेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. तसेच, मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यंत्रसामग्रीच्या वाटपामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
Tags
जिल्हा पालघर