*स्थलांतरित बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शिक्षणाची नवी पहाट* *जिल्हा परिषद शाळेत १४ मुलांचा प्रवेश, पुस्तके व गणवेशाचे वितरण*

 *तलासरी (प्रतिनिधी) :– अशरफ खान :–* पालघर, दि. ८ जानेवारी : स्थलांतरामुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या बांधकाम कामगारांच्या मुलांना शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. पालघर येथील स्थलांतरित बांधकाम मजुरांच्या १४ मुलांना जिल्हा परिषद शाळा, आनंदाश्रम येथे शालेय शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करण्यात आले, तसेच त्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश उपलब्ध करून देण्यात आले.
स्थलांतरित कुटुंबांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या संवेदनशील भूमिकेतून जिल्हाधिकारी कार्यालय, स्पर्श फाऊंडेशन व शिक्षण विभाग, पालघर यांनी तातडीने सर्वेक्षण करून ही मुले शाळेत दाखल केली.
या उपक्रमांतर्गत  जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशाचे वितरण करून त्यांचे  स्वागत करण्यात आले.
यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक)  सोनाली मातेकर, पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी निमिष मोहिते, बिट विस्तार अधिकारी नीलम पष्टे, केंद्रप्रमुख विनोद पाटील, तसेच स्पर्श फाऊंडेशनचे पदाधिकारी व सदस्य, बांधकाम कामगार पालक आणि शाळेत दाखल झालेले विद्यार्थी  उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
पालघर जिल्ह्यातील स्थलांतरित कुटुंबांच्या मुलांना नजीकच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये दाखल करून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची ही मोहिम समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.

Post a Comment

Previous Post Next Post