*तलासरी (प्रतिनिधी) :– अशरफ खान :–*
पालघर वाणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचणी व वाणगाव परिसरात कायदा व सुव्यवस्था तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून पतंग विक्रेत्यांवर अचानक तपासणी मोहीम राबविण्यात आली.
या तपासणीदरम्यान संबंधित परिसरातील पतंग विक्रेत्यांच्या दुकानांना भेट देऊन सखोल चौकशी करण्यात आली. यावेळी कोणताही विक्रेता नायलॉन मांजा विक्री करत नसल्याची खात्री पोलिसांनी करून घेतली. नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातांची दखल घेता, भविष्यातही नायलॉन मांजा विक्री करू नये, अशा स्पष्ट सूचना विक्रेत्यांना देण्यात आल्या.
तसेच, यापूर्वीच सर्व संबंधित विक्रेत्यांना नायलॉन मांजा विक्रीस प्रतिबंधाबाबत नोटीस बजावण्यात आलेली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. कायद्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
सदर कारवाई वाणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून नागरिकांनीही नायलॉन मांजाच्या वापरापासून दूर राहून सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Tags
जिल्हा पालघर