डहाणू नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा संपन्न; जगदीश राजपूत बिनविरोध उपनगराध्यक्ष, तीन नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती

 *तलासरी (प्रतिनिधी) :– अशरफ खान :–* 
डहाणू : नगर परिषदेच्या नव्या कार्यकाळाची औपचारिक सुरुवात करणारी पहिली सर्वसाधारण सभा मंगळवार, १३ जानेवारी २०२६ रोजी बी.एस.ई.एस. सभागृहात पार पडली. या सभेत उपनगराध्यक्ष पदाची बिनविरोध निवड तसेच नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीमुळे नगर परिषदेच्या प्रशासकीय रचनेला अंतिम स्वरूप देण्यात आले.

डहाणू नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता बी.एस.ई.एस.सभागृहात नगराध्यक्ष राजेंद्र लखू माच्छी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या प्रारंभी उपनगराध्यक्ष पदासाठी प्राप्त झालेल्या नामनिर्देशनांची माहिती सभागृहासमोर मांडण्यात आली. उपनगराध्यक्ष पदाकरिता जगदीश बंसराजसिंग राजपूत यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे पिठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष राजेंद्र लखू माच्छी यांनी अधिकृतरित्या जाहीर केले.

यानंतर नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीचा विषय सभेत मांडण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाचे गटनेते तन्मय शशिकांत बारी यांनी त्यांच्या गटामार्फत मिहीर चंद्रकांत शाह यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली. तसेच, भारतीय जनता पार्टीचे गटनेते जगदीश बंसराजसिंग राजपूत यांनी त्यांच्या गटामार्फत भरत राजपूत व धनंजय मेहेर यांच्या नावांची नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्तीसाठी शिफारस केली. सभागृहाने या सर्व शिफारसींना मंजुरी दिल्यानंतर मिहीर शाह, भरत राजपूत व धनंजय मेहेर यांची एकूण तीन नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याचे नगराध्यक्ष राजेंद्र माच्छी यांनी सभेत जाहीर केले. यावेळी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष तसेच नामनिर्देशित सदस्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. डहाणू नगर परिषदेच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षांनी यावेळी केले.

Post a Comment

Previous Post Next Post