तलासरी (प्रतिनिधी) :– अशरफ खान :–
डहाणू : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत राज्यात तिसरे ‘मधाचे गाव’ आणि 'चिकू' फळासाठी प्रसिद्ध म्हणून ओळख मिळवलेल्या डहाणू तालुक्यातील घोलवड गावात रुपेरी पडद्यावरील प्रसिद्ध मराठी विनोदी कलाकार व अभियानाचे ब्रँड ॲम्बेसेडर भाऊ कदम यांची मंगळवारी (दि.१३) विशेष भेट आयोजित करण्यात आली. मात्र, शासनाच्या या महत्त्वाकांक्षी अभियानाचा संदेश लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याऐवजी आयोजकांच्या नियोजनाअभावी संपूर्ण कार्यक्रम गोंधळात सापडत औपचारिकतेपुरताच मर्यादित राहिल्याने नागरिक, पालक, मान्यवर, तसेच स्टॉलधारकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
भाऊ कदम यांनी आपल्या भेटीदरम्यान टोकेपाडा येथील अमृत सरोवर योजनेअंतर्गत विकसित तलाव, महिलांनी तयार केलेल्या बांबू हस्तकला वस्तू, कोलपाडा येथील कृषी पर्यटन केंद्र तसेच मधुमक्षिका पालन व मध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उपक्रमांची पाहणी करत घोलवडच्या विकासाचे भरभरून कौतुक केले. घोलवड गाव भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात घोलवड पहिल्या क्रमांकाच्या पुरस्कारासाठी पात्र असल्याचे मत त्यांनी मांडले. मात्र, या कौतुकाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचे प्रत्यक्ष नियोजन पूर्णपणे ढासळलेले दिसून आले. जिल्हा परिषद शाळा, घोलवड मैदानावर सकाळी ११ वाजता सुरू होणारा मुख्य कार्यक्रम थेट दुपारी सुमारे २ वाजता सुरू करण्यात आला. विशेष म्हणजे, अवघ्या १५ मिनिटांत कार्यक्रम आटोपता घेण्यात आल्याने उपस्थितांना अक्षरशः धक्का बसला.
या कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना सकाळी ८ वाजताच मैदानावर बोलावण्यात आले होते. मात्र, कार्यक्रम उशिरा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना तासन्तास उन्हात थांबावे लागले आणि उशिरा सोडण्यात आल्याने पालकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले. प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित असतानाही मंचावरील मान्यवरांना संवाद साधण्याची संधीच मिळाली नाही. विविध विकास योजनांची माहिती देण्यासाठी व संवादासाठी उभारलेले पदार्थ, हस्तकला व इतर वस्तूंचे स्टॉल केवळ शोभेपुरतेच राहिले.स्टॉलधारकांना ना आपली उत्पादने सादर करता आली, ना भाऊ कदम यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यामुळे स्टॉलधारकांमध्येही तीव्र नाराजी दिसून आली.
कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात प्रचार-प्रसार करण्यात आल्याने भाऊ कदम यांच्या दर्शनासाठी चाहत्यांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, नियोजनाच्या अभावामुळे मुख्य कार्यक्रमाला पुरेसा वेळ न देता इतर ठिकाणी वेळ घालवण्यात आल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली. परिणामी, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा मुख्य संदेश सेलिब्रिटींच्या माध्यमातून प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा शासनाचा उद्देश साध्य झाला नसल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे घोलवड गावाच्या विकासाचे कौतुक होत असताना, दुसरीकडे या संपूर्ण कार्यक्रमातील नियोजनशून्यता, वेळेचे गैरव्यवस्थापन आणि लोकभावनांकडे झालेले दुर्लक्ष ही बाब आयोजकांसाठी आत्मपरीक्षणाची ठरली आहे. भविष्यात अशा महत्त्वाच्या शासकीय कार्यक्रमांचे आयोजन करताना केवळ औपचारिकता न करता काटेकोर नियोजन, वेळेचे भान आणि स्थानिक नागरिकांचा सन्मान राखला जाणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
Tags
जिल्हा पालघर