भूदानातून प्राप्त झालेल्या या भूमीच्या नामकरण समारंभासह थोर देणगीदार रामचंद्र हिराजी सावे जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा ११ जानेवारी रोजी तारापूर येथे उत्साहात पार पडला. तारापूर येथील शेतकरी रविकांत वासुदेव सावे व प्रभाकर वासुदेव सावे यांनी देणगी स्वरूपात दिलेल्या दीड एकर जमिनीबाबत बोलताना मनीषा सावे यांनी संघाच्या भावी उपक्रमांची दिशा स्पष्ट केली.
१०७ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या सोमवंशी क्षत्रिय समाज संघाने आजवर तारापूर परिसरातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले आहेत. रविकांत सावे व प्रभाकर सावे यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या दीड एकर जमिनीचा योग्य व समाजहिताचा वापर करण्याच्या दृष्टीने संघ सकारात्मक पावले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमाला सर्व समाजबांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने संघाच्या कार्यात मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका जयंती जगन्नाथ सावे व दामिनी जयवंत सावे यांना राहीसावे जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मानसोपचार तज्ज्ञ डॉ. देवेंद्र लक्ष्मण सावे उपस्थित होते. तसेच मुख्य विश्वस्त नरेश सावे, विश्वस्त विलास सावे, शरद वामन सावे यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.