कासा येथे बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे स्थलांतर; ग्राहकांना दिलासा देणारी नवी सामाजिक सुविधा

*तलासरी (प्रतिनिधी) :– अशरफ खान :–* डहाणू तालुक्यातील कासा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या स्थलांतरामुळे बँक ग्राहकांना दिलासा मिळाला असून, नव्या व्यवस्थेमुळे सामाजिक सुविधांच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. ग्राहकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन अडचणी दूर होऊन सेवा अधिक सुलभ व सुरक्षित होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

कासा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे अलीकडेच स्थलांतर करण्यात आले आहे. जरी इमारत तीच ठेवण्यात आली असली, तरी समोरील जागेवरील गाळ्यात नव्या ठिकाणी शाखेचे उद्घाटन करण्यात आले आहे. या बदलामुळे बँक ग्राहकांना येणाऱ्या अनेक अडचणी दूर होणार असल्याची प्रतिक्रिया ग्राहकांकडून व्यक्त होत आहे. यापूर्वी बँकेत व्यवहारासाठी मोठ्या प्रमाणात रांगा लागत होत्या. त्यामुळे ग्राहकांना ऊन, पाऊस यांसारख्या नैसर्गिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. अनेकदा रांग थेट रस्त्यावर जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन नागरिकांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत होता. मात्र, नव्या ठिकाणी मोकळी आणि प्रशस्त जागा उपलब्ध झाल्याने आता ग्राहकांना सुरक्षित व सुकर वातावरणात व्यवहार करता येणार आहे.

या नव्या शाखेचे उद्घाटन चारोटी गावातील बँक ग्राहक यांच्या हस्ते करण्यात आले, तर प्रवेशद्वारावरील रिबीन जागेचे मालक शैलेश घारपुरे यांच्या हस्ते कापण्यात आली. उद्घाटनप्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक अनिल जांगीर, उपव्यवस्थापक हिरेन पटेल, बँक कर्मचारी अनुसया ठाकरे यांच्यासह मोठ्या संख्येने बँक ग्राहक उपस्थित होते. नव्या व्यवस्थेमुळे बँकेच्या सेवा अधिक सुकर, जलद आणि ग्राहकाभिमुख होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. सामाजिक सुविधांच्या दृष्टीने हा बदल महत्त्वपूर्ण ठरून कासा परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post