बोर्डी समुद्रकिनाऱ्याच्या पर्यटन विकासाला नवे बळ ; आमदार निकोले यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ


*तलासरी (प्रतिनिधी) :– अशरफ खान :–*
पालघर जिल्ह्यातील पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा व निसर्गसौंदर्याने नटलेला बोर्डी समुद्रकिनारा आता आधुनिक सुविधांसह नव्या रूपात पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे. बोर्डी समुद्रकिनाऱ्याच्या सर्वांगीण पर्यटन विकासासाठी प्रस्तावित विविध विकासकामांचा शुभारंभ मंगळवार, दि.१३ जानेवारी रोजी डहाणू विधानसभा आमदार विनोद निकोले यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.

बोर्डी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सौमिल राऊत यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तसेच ग्रामपंचायत आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हा महत्त्वाचा विकास टप्पा प्रत्यक्षात साकार होत आहे. या अंतर्गत बोर्डी समुद्रकिनाऱ्यावरील कॅम्पिंग ग्राउंडसमोर लहान बालकांसाठी आधुनिक खेळ उद्यान (चिल्ड्रन प्ले पार्क) उभारण्यात येणार असून, पर्यटकांसाठी सुरक्षित व आकर्षक वातावरण निर्माण होणार आहे. तसेच, कॅम्पिंग ग्राउंडसमोरील समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्यीकरण, पर्यटकांसाठी वॉकवे (पायवाट) बांधकाम, समुद्रकिनाऱ्यावर बसण्याची (बैठक) सोय, तसेच, समुद्रकिनाऱ्याच्या मागील बाजूस असलेल्या कॅम्पिंग ग्राउंड परिसरात पर्यटकांसाठी स्वतंत्र पायवाट बांधण्याच्या कामांचाही शुभारंभ यावेळी करण्यात आला.

या विकासकामांमुळे बोर्डी समुद्रकिनाऱ्याला पर्यटनाच्या दृष्टीने नवे स्वरूप प्राप्त होणार असून, स्थानिक नागरिकांसह बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. परिणामी स्थानिक रोजगार, छोटे व्यवसाय, पर्यटनपूरक उद्योग यांना अधिक चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी आमदार विनोद निकोले यांनी बोर्डीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांशी संवाद साधत विकासाबाबत सविस्तर चर्चा केली. ग्रामस्थांच्या समस्या, पर्यटन व्यवस्थापन, स्वच्छता, वाहतूक आणि सुरक्षितता या मुद्द्यांवर सकारात्मक व उपाययोजनात्मक चर्चा झाली.

दरम्यान, घोलवड पोलीस उपनिरीक्षक संदीप कहाळे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात सडक सुरक्षा विषयावर विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी रस्ते अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना, वाहतूक नियंत्रण, तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर भर देण्यात आला. या सर्व विकासकामांमुळे बोर्डी परिसराचा कायापालट होणार असून, पर्यटनाच्या नकाशावर बोर्डीचे स्थान अधिक भक्कम होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. बोर्डीसह संपूर्ण डहाणू मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढेही सदैव कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार विनोद निकोले यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post