मुसारणे फाट्यावर रस्त्याची जीवघेणी दुरवस्था* *ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे दुचाकीस्वाराचा गंभीर अपघात...*

 *पालघर जिल्हा (प्रतिनिधी) :– अमीन मेमन :–वाडा रोड मुसारणे फाटा येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामातील गंभीर त्रुटींमुळे आज एक भीषण अपघात घडला. रस्ता बांधकाम करणाऱ्या इंगल कंपनीच्या निष्काळजी व बेजबाबदार कामामुळे दुचाकीस्वाराचा तोल गेला आणि झालेल्या अपघातात प्रसाद महाडीक (रा. कुडूस, गळा कंपनी) यांचा पाय गंभीररीत्या फ्रॅक्चर झाला.
या ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत सोडण्यात आले असून मोठे खड्डे, खचलेले कडे आणि उंचसखल रस्ता नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे अपघातप्रवण ठिकाणी कोणतेही सूचना फलक, बॅरिकेड्स किंवा सुरक्षेची साधी उपाययोजनाही करण्यात आलेली नाही. अवजड वाहनांची सतत वर्दळ सुरू असताना दुचाकीस्वार खचलेल्या भागात घसरून थेट ट्रकजवळ अडकला आणि हा अपघात घडला.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीचा हात पुढे करत जखमी प्रसाद महाडीक यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, या रस्त्याच्या धोकादायक अवस्थेबाबत यापूर्वीही वारंवार तक्रारी करूनसुद्धा ठेकेदार कंपनी व संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
“हा अपघात म्हणजे प्रशासन आणि ठेकेदार कंपनीच्या निष्क्रियतेचा जिवंत पुरावा आहे,” अशा शब्दांत नागरिकांनी संताप व्यक्त केला. रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद करावी, तात्काळ बॅरिकेड्स व चेतावणी फलक उभारावेत आणि दोषी कंपनीवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी स्थानिकांकडून होत आहे.
वेळीच ठोस पावले उचलली नाहीत, तर मुसारणे फाटा भविष्यात आणखी मोठ्या दुर्घटनांचा साक्षीदार ठरेल, असा गंभीर इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post