तुळजापूर शहर घाणीच्या विळख्यात; नगरसेवकांचे मुख्याधिकाऱ्यांना तात्काळ कारवाईचे निवेदन


तुळजापूर (प्रतिनिधी):तुळजापूर शहरातील नाल्या, गटारी तुंबल्या; स्वच्छतेअभावी नागरिकांच्या आरोग्याला धोकानगरसेवकांचे मुख्याधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाहीचे निवेदन तुळजापूर शहरामध्ये ठिकठिकाणी नाल्या, गटारी तुंबून घाणीचे साम्राज्य पसरले असून गटारीतील सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत आहे. यामुळे डासांची उत्पत्ती वाढून नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. तसेच शहरात येणाऱ्या भाविक भक्तांमध्ये तुळजापूर शहराची प्रतिमा अस्वच्छ शहर म्हणून जात असल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत तुळजापूर नगर परिषदेचे नगरसेवक  अमोल माधवराव कुतवळ,  आनंद नानासाहेब जगताप,  अक्षय धनंजय कदम, रणजीत चंद्रकांत इंगळे व नगरसेविका सौ. प्रगती गोपाळ लोंढे यांनी मुख्याधिकारी, नगर परिषद तुळजापूर यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरातील अनेक भागांमध्ये गटारींची झाकणे तुटलेल्या अवस्थेत असून नागरिकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहे व परिसर स्वच्छ नसल्यामुळे तीव्र दुर्गंधी पसरली आहे. मंजूर ठिकाणी असलेल्या कचरा कुंड्यांची वेळेवर स्वच्छता होत नसून कचरा घंटा गाडी दररोज नियमितपणे फिरत नसल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
यामुळे तुळजापूर शहरातील सर्व नाल्या, गटारी, परिसर व सार्वजनिक स्वच्छतागृहे तात्काळ स्वच्छ करावीत. तसेच कचरा कुंडी व कचरा घंटा गाडीची दररोज वेळेवर व्यवस्था करावी, अशी ठाम मागणी नगरसेवकांनी केली आहे.
स्वच्छता विभागाने या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post