पुणे / प्रतिनिधी :(सत्यम सोनकांबळे):- घरगुती गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी निर्णय; हॉटेल, रेस्टॉरंट आणि उद्योगांना फटका पश्चिम आशियात सुरू असलेल्या इराण–अमेरिका–इस्त्रायल युद्धाचे परिणाम आता भारतातही जाणवू लागले आहेत. युद्धाचा आज सातवा दिवस असून दोन्ही बाजूंनी हल्ले सुरू आहेत. या संघर्षामुळे जागतिक स्तरावर तेल आणि गॅस पुरवठा साखळीवर परिणाम होत असून त्याचे पडसाद भारतात उमटू लागले आहेत.
या पार्श्वभूमीवर पुण्यात व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घरगुती गॅसचा पुरवठा नागरिकांना सुरळीत राहावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती तेल कंपन्यांकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीपीसीएलच्या शिक्रापूर येथील प्लांटमधून तसेच एचपीसीएलच्या चाकण येथील प्लांटमधून व्यावसायिक गॅस सिलेंडर देणे सध्या थांबवण्यात आले आहे. या संदर्भात डीलर्सना संदेश पाठवून पुढील आदेश मिळेपर्यंत कमर्शियल सिलेंडर घेण्यासाठी गाड्या पाठवू नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
डीलर्सना पाठवलेला संदेश
तेल कंपन्यांनी डीलर्सना पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे की,
“युद्धजन्य परिस्थितीमुळे कमर्शियल गॅस पुरवठा तात्पुरता थांबवण्यात येत आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत सिलेंडर घेण्यासाठी वाहने पाठवू नयेत. परिस्थिती सुधारल्यानंतर तात्काळ कळवण्यात येईल.”
कोठे वापरला जातो व्यावसायिक गॅस?
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वापर प्रामुख्याने
हॉटेल, रेस्टॉरंट, कॅफे आणि धाबे
केटरिंग सेवा
बेकरी आणि मिठाईची दुकाने
हॉस्पिटल व ऑफिस कँटीन
सेरॅमिक्स, वस्त्रोद्योग व इतर औद्योगिक युनिट्स
यामध्ये मोठ्या प्रमाणावर होत असल्याने या निर्णयाचा परिणाम अनेक व्यावसायिकांवर होण्याची शक्यता आहे.
युद्धाचे कारण काय?
इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र क्षमतेत वाढ होत असल्याचा आरोप करत इस्रायल आणि अमेरिकेने इराणला वारंवार इशारे दिले होते. मात्र इराणने हा कार्यक्रम थांबवण्यास नकार दिल्यानंतर इराणची राजधानी तेहरानवर हल्ले करण्यात आले, ज्यामुळे मध्यपूर्वेत पुन्हा एकदा तणाव वाढला आहे.
या संघर्षामुळे जागतिक तेल बाजार अस्थिर झाला असून कच्च्या तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, ज्याचा परिणाम भारतातील इंधन आणि गॅस पुरवठ्यावर होऊ शकतो.
Tags
जिल्हा पुणे