No title



 

मुंबई दि. ३० :  महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत सर्व विभागांमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव  यांचा  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या  हस्ते नुकताच गौरव करण्यात आला.

हा सेवाकर्मी उपक्रम राज्यातील शासकीय सेवांची प्रगती सर्वांगीणपणे मोजण्यासाठी तसेच पारदर्शक, कार्यक्षम आणि जबाबदार प्रशासनाला चालना देण्यासाठी राबविण्यात आला होता. या अंतर्गत विभागाच्या संघटनात्मक रचना, सेवाप्रवेश नियम, पदोन्नती व थेट भरती स्थिती, गोपनीय अहवालांचे व्यवस्थापन, अनुकंपा नियुक्ती प्रक्रिया, आयजीओटी पोर्टलवरील प्रशिक्षण तसेच विभागीय चौकशी प्रकरणांच्या निपटाऱ्यासारख्या महत्त्वाच्या बाबींचा सखोल आढावा घेण्यात आला.

तसेच ‘सेवाकर्मी टेक’ घटकांद्वारे तंत्रज्ञानाचा वापर आणि डिजिटल प्रशासनाची प्रगती तपासण्यात आली. यात पदोन्नती ट्रॅकिंग, ‘डिजिटल महापार’द्वारे गोपनीय अहवालांचे डिजिटायझेशन, आयजीओटी प्रशिक्षण पूर्णता आणि ई-एचआरएमएस प्रणालीचा प्रभावी वापर यांचा समावेश होता.

या कठोर मूल्यमापनात प्रथम क्रमांक मिळवणे हे महिला व बालविकास विभागाच्या सक्षम प्रशासन पद्धती, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि उत्कृष्ट सेवा देण्याच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेचे प्रतीक आहे.

या यशाबद्दल संपूर्ण महिला व बालविकास विभागाच्या समूहाचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या समर्पणामुळे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अधिक पारदर्शक, प्रतिसादक्षम आणि नागरिक-केंद्रित प्रशासन बळकट होत असल्याचे अधोरेखित करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post