१५६ कोटींच्या निधीवर डल्ला; तुळजापूरमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप!


धाराशिव :- (प्रतिनिधी ) तुळजापूर शहरातील नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या तब्बल १५६ कोटी रुपयांच्या रस्ते कामांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे. १३ एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या पत्रकार परिषदेस नगरसेवक अमोल कुतवळ, रणजीत इंगळे, आनंद जगताप व ऋषिकेश मगर उपस्थित होते. तुळजापूर हे आई तुळजाभवानीचे पवित्र क्षेत्र असल्यामुळे येथे दरवर्षी लाखो भाविक येत असतात. अशा महत्त्वाच्या शहरातील रस्त्यांच्या विकासासाठी शासनाकडून मोठा निधी मंजूर झाला असतानाही प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये रस्त्यांची दयनीय अवस्था कायम असल्याचे निदर्शनास आले आहे.महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, स्थानिक सत्ताधाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर दबाव टाकून निधीचा गैरवापर केला. लोकवस्तीच्या भागात रस्त्यांची कामे प्रलंबित ठेवून काही खाजगी विकासकांच्या प्लॉटिंगमध्येच रस्ते तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. नगरविकास विभागाच्या नियमांनुसार खाजगी विकासकांनी आवश्यक सुविधा स्वतः करणे बंधनकारक असतानाही शासनाच्या निधीतून ही कामे करण्यात आली, यामुळे शासकीय पैशांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाल्याचा आरोप करण्यात आला.
तसेच, संबंधित ठेकेदाराने निविदा प्रक्रियेत बनावट कागदपत्रे सादर करून राजकीय दबावातून काम मिळवल्याचा गंभीर मुद्दाही उपस्थित करण्यात आला. या संदर्भातील पुरावे जोडून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी महाविकास आघाडीतून होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post