तुळजाभवानी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी


तुळजापूर | प्रतिनिधी
आज दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी तुळजाभवानी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांमध्ये विश्वरत्न, बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थी, सर्व शिक्षकवृंद तसेच मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून डॉ. आंबेडकर यांचे प्रेरणादायी जीवन, समाजासाठी केलेला संघर्ष तसेच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांद्वारे भारतीय राज्यघटनेतून प्रत्येक नागरिकाला मिळालेले हक्क याविषयी प्रभावीपणे मांडणी केली. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा सखोल परिचय करून देत मार्गदर्शन केले. शासनाच्या निर्देशानुसार या निमित्ताने विद्यार्थ्यांचे सामूहिक वाचनही घेण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी उत्कृष्टरीत्या पार पाडले.कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपावेळी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक  फाटे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे पालन करण्याचे आवाहन केले. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post